आई-वडिलांशी न पटले ; मुलीने रागात घर सोडले दामिनी पथकाची झटपट कारवाई: बालगृहात रवानगी
By बापू सोळुंके | Published: May 18, 2023 09:22 PM2023-05-18T21:22:22+5:302023-05-18T21:22:30+5:30
शेवटी महिला व बालकल्याण समितीच्या आदेशाने तिची रवानगी छावणीतील बालगृहात केली.
छत्रपती संभाजीनगर: आई मनोरुग्ण तर वडिल पुजारी असलेल्या दाम्पत्याची १४ वर्षीय मुलगी वडिलांसोबत पटत नाही, म्हणून घरातून बाहेर पडली आणि रेल्वेस्टेशनवर आली. ही बाब तेथे काम करणाऱ्या हॉकर्सच्या लक्षात आली आणि त्यांनी तिची माहिती पोलिसांना दिल्याने आज ती मुलगी सुरक्षित आहे.
दामिनी पथकाने तिला ताब्यात घेतले तेव्हा तिच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा आईचे सोन्याचे दागिने, वडिलांची अंगठी, दहा हजाराची रोकड आणि चिल्लर व मोबाइल असा ऐवज मिळाला. पोलिसांनी तिची समजूत काढल्यानंतरही तिने वडिलांच्या घरी जाण्यास नकार दिला. शेवटी महिला व बालकल्याण समितीच्या आदेशाने तिची रवानगी छावणीतील बालगृहात केली.
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन येथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास १४वर्षिय मुलगी हातात बॅग घेऊन फिरत होती. तेथील पाणी बॉटल विक्रेत्या मुलांना ती दिसल्यानंतर पोलिसांना कळविली. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे आणि हवालदार सुभाष मानकर, सुजाता खरात, अंबिका दारुंटे, गिरीजा आंधळे यांनी रेल्वेस्टेशन येथे जाऊन त्या मुलीला ताब्यात घेतले.
तिचे नाव आणि पत्ता विचारल्यानंतर ती घरातून निघून आल्याचे आणि एच.पी. नावाच्या मुलाच्या सांगण्यावरून रेल्वेस्टेशन आल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पथकाने तिच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची ही एकुलती आणि लाडकी मुलगी आहे. तिची आई मानसिक आजारी असून तीन महिन्यापासून मामाकडे आहे. घरी वृद्ध आजी आणि वडिलांसोबत ती राहते.
तीन महिन्यापासून ती मोबाईलवर वेगवेगळ्या मुलांसोबत बोलत असते. तिला रागावले तर ती त्यांच्यावर ओरडते, माझा सांभाळ करण्याची तुमची लायकी नाही,असे म्हणतेय. यामुळे त्यांनी तिच्यासमोर हात टेकले आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी तिचे वडिल कामावर गेल्यानंतर तिने घरातील सोन्याचे दागिने, दहा हजाराची रोकड आणि चिल्लर व वडिलांचा मोबाइलसह घर सोडले आणि ती रेल्वेस्टेशनवर आली. एच.पी.नावाच्या मित्राने तिला रेल्वेस्टेशन येथे बोलावले होते.मात्र तो आला नव्हता. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी तिचे समुपदेशन केल्यानंतरही तिने वडिलांच्या घरी जाण्यास नकार दिला. शेवटी महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले असता समितीने दिलेल्या आदेशानंतर तिची रवानगी छावणीतील विद्यादीप बालगृहात केली.