नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सव दिनाला पाहुणे बोलावण्यावरून मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:42 PM2018-11-29T23:42:20+5:302018-11-29T23:42:53+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला. मात्र, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांनी त्यास विरोध केल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऐतिहासिक लढ्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी घेतला. येत्या १४ जानेवारी रोजी या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देवगिरी महाविद्यालयात सर्वपक्षीयांतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भेटीतच कुलगुरूंचे शरद पवार यांच्याशी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात प्राथमिक बोलणे झाले होते. रौप्यमहोत्सव काही दिवसांवर आलेला आहे. यामुळे कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शरद पवार यांना बोलावण्याचा ठराव मांडला होता. मात्र, किशोर शितोळे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे, अशी मागणी केली. या मागणीला सर्व सदस्यांनी होकार दर्शविला. इतरही काही नावांची सूचना सदस्यांनी केली. तेव्हा कुलगुरूंनी या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले. मात्र, बैठक मध्यंतरासाठी थांबली असता, शितोळे यांनी पुन्हा कुलगुरूंची भेट घेऊन शरद पवार यांच्याऐवजी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बोलावावे, त्यांच्याशिवाय इतर कोणीही पाहुणा आणू नये, अशी मागणी केली. यामुळेच कुलगुरूंनी नामविस्ताराला पाहुणा बोलवण्याचा विषयच प्रलंबित ठेवल्याचा आरोप डॉ. नरेंद्र काळे यांनी केला.
कोट,
विद्यापीठाच्या ऐतिहासिक नामविस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व्यक्तींना बोलावले पाहिजे. मात्र, ज्यांनी नामविस्ताराला विरोध केला त्या विचारसरणीच्या लोकांना बोलावण्याचा आग्रह करण्यात येत आहे. हे दुर्दैव आहे. सरकारचा धाक दाखवून कुलगुरूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही चांगल्या निर्णयासाठी कुलगुरूंसोबत आहोत. त्यांनी भूमिका बदलू नये.
- डॉ. नरेंद्र काळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद
------------------------
नामविस्तार दिनाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलावत असाल तर विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही बोलावले पाहिजे, अशी मागणी केली. मात्र, सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत. कुलगुरूंवर कोणताही दबाव आणलेला नाही.
- किशोर शितोळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद