मोठ्या प्रतीक्षेनंतरही निराशाच; औरंगाबादची रेल्वे पीटलाईन अखेर जालन्याला पळवली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 06:39 PM2022-01-03T18:39:43+5:302022-01-03T18:43:03+5:30
राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद : औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रेल्वेची पीटलाईन अखेर जालन्याला पळविण्यात आली आहे. पीटलाईन जालन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केली.
औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही रेल्वेने हाती घेतले. मात्र चिकलठाण्यात रेल्वेची जागा अपुरी आहे. राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याच वेळी जालन्यातही जागेची पाहणी झाली. त्यामुळे पीटलाईन जालन्याला जाण्याचे संकेत मिळाले होते. अखेर जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा रविवारी दानवे यांनी केली.
औरंगाबादेत जागेचा शोध असफल
औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी पीटलाईनसाठी औरंगाबादेत महिनाभरात जागा शोधण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर सोपवली होती.
निकष पूर्ण करणारे शहर असूनही...
द. म. रेल्वेच्या मुख्यालयाकडून २०१७ मध्ये पीटलाईनला मंजुरी मिळाली होती. परंतु ती पुढे विविध कारणांनी अडविली गेली. संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात औरंगाबाद हे एक मोठे शहर आहे. पीटलाईनसाठीचे सर्व निकष औरंगाबाद पूर्ण करते.
पीटलाईन नसल्याचा काय तोटा?
पीटलाईन नसल्यामुळे औरंगाबादहून नव्या रेल्वेगाड्या सुरू होण्यास अडचणी येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. आता जालन्याला पीटलाईन होणार असल्याने जालन्याहूनच नव्या रेल्वे सुरू होतील.
आधीच माहीत होते...
काही ना काही कारण पुढे करून पीटलाईन जालन्याला नेली जाणार आहे, हे आधीच माहीत होते. पण रेल्वेची प्रत्येक गोष्ट जालन्याला नेता कामा नये. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. आता भाजपचे औरंगाबादचे लोकप्रतिनिधी यावर काय बोलणार, हा प्रश्न आहे.
- खा. इम्तियाज जलिल