अनर्थ टळला ! आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 05:11 PM2021-01-23T17:11:36+5:302021-01-23T17:22:07+5:30
चिमुकलीच्या अपहरणानंतर आजीने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्याने तिला सोडून पळ काढला
वाळूज महानगर : आजी-आजोबाजवळ झोपलेल्या पाचवर्षीय चिमुकलीला पळवून नेण्याचा प्रयत्न आजीच्या सतर्कतेमुळे फसल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास वडगाव परिसरात घडली. चिमुकलीच्या अपहरणानंतर आजीने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्याने तिला सोडून पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला.
सुया-पोत विक्री करणारे जवळपास १५ कुटुंबीय वडगाव परिसरातील झोपड्यांत राहत असून, दिवसभर सुया-पोत विक्री करून कुटुंबाची उपजीविका करतात. या भटक्या कुटुंबातील एक पाचवर्षीय चिमुकली याच ठिकाणी आजी-आजोबांसोबत राहते. गुरुवारी (दि. २१) रात्री जेवण केल्यानंतर या कुटुंबातील सदस्य आपापल्या झोपड्यांत झोपी गेले होते. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आजी-आजोबांजवळ झोपलेल्या त्या चिमुकलीला उचलून घेऊन जाऊ लागली. चिमुकलीने आरडा-ओरडा केला असता तिच्या आजीला जाग आली. तिला नात झोपडीत दिसली नाही. रात्री झोपडीबाहेर नात लघुशंकेसाठी गेली असेल असे म्हणून आजीने झोपडीबाहेर आली असता अंधारात एक अनोळखी व्यक्ती तिच्या नातीला कडेवर घेऊन बजाजनगरकडे जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच आजीने मदतीसाठी आरडा-ओरडा केला असता लगतच्या झोपडीतील तरुण बाहेर आले असता तिने चिमुकलीला कुणीतरी घेऊन जात असल्याचे त्यांना सांगितले.
चिमकुलीला पळवून नेले जात असल्याची माहिती मिळताच झोपडीतून बाहेर आलेले तरुण बजाजनगरच्या दिशेने निघालेल्या अपहरणकर्त्याच्या मागे पळत सुटले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या अपहरणकर्त्यांने त्या चिमुकलीला मोकळ्या मैदानावर टाकून देत भिंतीवरून उडी मारून बजाजनगरात अंधारात पसार झाला. यानंतर त्या तरुणांनी चिमुकलीला परत आणले. आपली नात सुखरूप असल्याचे दिसून येताच आजी-आजोबांचा जीव भांड्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक सतीश पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन फरार अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.