वसुलीवरून महावितरणची कोंडी

By Admin | Published: February 4, 2017 12:29 AM2017-02-04T00:29:59+5:302017-02-04T00:34:02+5:30

बीड महावितरणच्या बीड विभागाच्या थकबाकीत वाढ होत आहे.

Disbursement of Mahavitaran from the recovery | वसुलीवरून महावितरणची कोंडी

वसुलीवरून महावितरणची कोंडी

googlenewsNext

राजेश खराडे  बीड
महावितरणच्या बीड विभागाच्या थकबाकीत वाढ होत आहे. विभागाकडे सद्य:स्थितीला जवळपास ११०० कोटींची थकबाकी असून, घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांकडे जवळपास १५० कोटी थकीत असल्याने विभागाच्या अडचणी वाढत आहेत. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकता नसल्याने थकबाकीचा आकडा फुगत आहे. ग्राहकांची उदासीनता व वरिष्ठ कार्यालयाचा वाढता दबाव यामुळे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.
रबी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच वसुलीसंदर्भाच्या बैठका पार पडत आहेत. महावितरणचे विभागीय संचालक संजीवकुमार यांनी बैठक घेऊन युनिटनुसार वसुली करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. लातूर झोनमध्ये सर्वाधिक थकबाकी बीड विभागाकडे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. महावितरणची सर्वतोपरी ग्राहकांना सेवा देऊन वीज बिल जमा करण्याबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी आदेश दिले. मात्र, बीड विभागातील ग्राहकांची बिले अदा करण्याबाबत उदासीनता महावितरणसाठी घातक ठरत आहे. केवळ बीड अर्बनमधून समाधानकारक वसुली होत आहे.
सहा महिन्यांपासून ग्राहकांचा बिले अदा करण्याकडे कानाडोळा आहे. शिवाय, कृषिपंपांची सर्वाधिक थकबाकी रखडली आहे. महिनाकाठचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने सोयी-सुविधांबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून दुजाभाव होत आहे. सद्य:स्थितीला केवळ रोहित्र दुरुस्तीसाठी तेल उपलब्ध नसल्याने अनेक गावे अंधारात आहेत. यासंबंधी मागणी करताचा थकबाकीचा विषय पुढे केला जात आहे. विभागीय पातळीवर वसुलीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय पातळीवर बैठका घेत आहेत. मार्च अखेरच्या अनुषंगाने वसुली मोहीम सुरू करण्यात आली असली तरी ग्राहकांची उदासीनता याकामी प्रमुख अडथळा बनली आहे.

Web Title: Disbursement of Mahavitaran from the recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.