चर्चा वांझोटी; कचरा औरंगाबाद शहरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:23 AM2018-02-24T00:23:56+5:302018-02-24T00:24:03+5:30
नारेगावातील डेपोत कचरा टाकण्याच्या विरोधात आठ दिवसांपासून आसपासच्या गावांतील नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केलेली मध्यस्थी शुक्रवारी अपयशी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नारेगावातील डेपोत कचरा टाकण्याच्या विरोधात आठ दिवसांपासून आसपासच्या गावांतील नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केलेली मध्यस्थी शुक्रवारी अपयशी ठरली. वांझोट्या चर्चेचे राजकीय गुºहाळ दीड तास चालल्यानंतरही शहरातील कचरा शनिवारपासून कुठे टाकायचा, याबाबत काहीही निर्णय झाला नाही. विभागीय व जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस यंत्रणा आठ दिवसांपासून या विषयावर बैठकीच्या सत्रात अडकली असून, काहीही तोडगा निघत नसल्यामुळे शहराची पूर्णत: कचराकोंडी झाली आहे. दबावासमोर प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली असून दुसरीकडे शहरात कचºयाचे ढीग निर्माण होत आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात कचरा प्रश्नी चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत शुक्रवारी विमानतळावरून थेट नारेगावातील आंदोलनस्थळी पोहोचले. तेथे त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केली. काही दिवस डेपोतील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी लागतील. तेवढा वेळ त्यांनी आंदोलकांकडे मागितला; परंतु आंदोलकांनी त्यांच्या त्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलकांशी चर्चा निष्फळ ठरली. त्या चर्चेत आंदोलकांना कुठलेही ठोस आश्वासन न दिल्यामुळे आंदोलक विभागीय आयुक्तालयात चर्चेला आले नाहीत.
पालकमंत्र्यांसह पालिका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महसूल, पोलीस अधिकाºयांचा ताफा विभागीय आयुक्तालयात पोहोचला. तेथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेते विकास जैन, सभापती गजानन बारवाल, नगरसेवक राजू शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्त डी.एम.मुगळीकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, आदींच्या उपस्थितीत कचरा कुठे टाकायचा, यावर खल झाला; परंतु तोडगा निघाला नाही.
पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले...
बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दीड मिनिटे संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही गावकºयांना आवाहन केले होते; परंतु ते चर्चेला आले नाहीत, हे खरे आहे. आमच्याकडे दोन ते तीन जागा आहेत. त्या जागांचा आढावा घेऊन तीन ते चार दिवसांत व्यवस्था केली जाईल, ती करू. प्रक्रिया प्रकल्पाला पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्याचा प्रशासकीय कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठेही कचरा टाकू दिला जात नाही, शनिवारपासून काय तयारी केली आहे, यावर डॉ. सावंत म्हणाले, कचरा टाकण्यास उद्या सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न जातो, येथील यंत्रणा असक्षम आहे काय, असे विचारले असता पालकमंत्री म्हणाले, असे काही नाही.
मनपाच्या मालकीची जागा असताना तेथे राजकारण केले जात आहे का? या प्रश्नावर डॉ. सावंत यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरही मार्ग निघेना
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिल्यानंतरही शुक्रवारी कचरा डेपो प्रकरणात ठोस असा निर्णय झाला नाही. यामागे नेमके राजकारण काय आहे? फुलंब्री मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळाच्या आजूबाजूला हा मुद्दा फिरत असल्याचा आरोप शिवसेनेने बुधवारी केला होता. पालकमंत्री डॉ.सावंत हे मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणूनच शुक्रवारी आले असताना नारेगाव आणि विभागीय आयुक्तालयातील बैठका निष्फळ ठरल्यामुळे शहरातील कचरा कोंडी केव्हा फुटणार असा प्रश्न आहे.
आयुक्त म्हणतील तेथे कचरा टाकू
शनिवारपासून कचरा कुठे टाकणार, असा प्रश्न पत्रकारांनी मनपा आयुक्त मुगळीकर यांना विचारला असता ‘विभागीय आयुक्त डॉ. भापकर सांगतील तेथे कचरा टाकू’ असे म्हणून त्यांनी हात झटकले. यावर डॉ. भापकर यांना विचारले असता ते म्हणाले, मी कसे सांगणार कचरा कुठे टाकायचा. बळाचा वापर करून नारेगावात कचरा टाकायचा का?, असा प्रश्न मुगळीकर यांना विचारला असता, मुगळीकर म्हणाले, ‘बळाचा वापर केला पाहिजे’. मात्र काही क्षणातच मुगळीकर यांनी विधान मागे घेतले. या प्रश्नोत्तरात जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी मध्यस्थी करीत तीन जागांचा पर्याय मांडला.
जिल्हाधिकारी म्हणाले...
जिल्हाधिकारी एन. के. राम म्हणाले, नारेगाव, बाभूळगाव आणि सफारी पार्क परिसरात कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा समोर आल्या आहेत. यातील एका ठिकाणी शनिवारपासून कचरा टाकण्यास सुरुवात होईल. नारेगाव डेपोत कचरा टाकण्यासाठी बळाचा वापर करणे किती योग्य राहील, याबाबत विचार केला जाईल. परंतु तेथील नागरिकांनी सुरू केलेला विरोध हादेखील योग्य नाही, असे माझे स्पष्ट मत असल्याचे जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.