पर्यायी जागेसाठी खल चालूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:05 AM2018-03-06T01:05:10+5:302018-03-06T01:05:13+5:30
नारेगाव-मांडकी येथे १६ दिवसांपासून कचरा टाकण्यास ग्रामस्थ विरोध करीत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. त्यामुळे महापालिकेची पुरती दमछाक झाली असून, पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्तालयात मॅरेथॉन बैठक झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथे १६ दिवसांपासून कचरा टाकण्यास ग्रामस्थ विरोध करीत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. त्यामुळे महापालिकेची पुरती दमछाक झाली असून, पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्तालयात मॅरेथॉन बैठक झाली. पर्यायी जागेच्या माहितीसह ३ महिन्यांतील मास्टर प्लान घेऊन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती कोर्टात गेल्याने कचरा टाकण्यासाठी जागेवर शोध हा विषय अर्धवट राहिला.
मनपाने नारेगाव वगळता कचरा टाकण्यासाठी तीसगाव, पडेगाव-मिटमिटा, गोलवाडी (छावणी परिषद), कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गांधेली येथील जागा शोधल्या. तेथे कचरा टाकण्याचा प्रयत्नही पालिकेने केला; परंतु नागरी विरोधामुळे पालिकेला पोलीस बंदोबस्ताचा सहारा घेणे भाग पडले. तरीही कचºयाची विल्हेवाट करण्यात मनपाला अपयश आले आहे. सायंकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत पुन्हा पर्यायी जागेच्या शोधासाठी बैठक झाली. बैठकीला मनपा व महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील कोणत्याही भागात कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध पाहता सर्व यंत्रणा हतबल झाली आहे. रविवारी रात्री गोलवाडी परिसरात पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला, विरोध करणाºयांवर लाठीचार्जही झाला. गांधेलीत पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्याची धमकी प्रशासनाने दिल्यामुळे नागरिकांनी जागता पहारा
दिला.
सोमवारी कचरा डेपोविरोधात घेतलेला ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. ठरावावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.