‘लीजहोल्डचे फ्रीहोल्ड’साठी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 11:18 PM2016-09-12T23:18:28+5:302016-09-12T23:24:09+5:30
औरंगाबाद : लीजहोल्डवरून फ्रीहोल्ड करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूअसल्याचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
औरंगाबाद : सिडको-हडकोतील मालमत्ता लीजहोल्डवरून फ्रीहोल्ड करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूअसल्याचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. सिडकोच्या समस्या सोडविण्याबाबतचे पत्र खा. चंद्रकांत खैरे यांनी मुख्य प्रशासक केंद्रेकर यांना दिले.
वाळूज महानगर प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्यात याव्यात. याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाने बैठकीत सांगितले. वाळूज महानगर प्रकल्पात शेतकऱ्यांकडील ७५ टक्के मालकीच्या जमिनीपैकी मंजूर ले-आऊटमध्ये दोनपेक्षा अधिकचे भूखंड एकत्रीकरणाची परवानगी द्यावी. ज्या शेतकऱ्यांना जमीन संपादन मोबदल्यात टीडीआर हवा आहे, त्यांना टीडीआर मंजूर करावा. वाळूजमधील अनधिकृत वसाहती नियमित करण्यात याव्यात. हस्तांतरण सुलभ करून अतिरिक्त भाडेपट्टा आकारात असल्यामुळे लेट प्लान सबमिशनपोटी आकारण्यात येत असलेले पाच हजार रुपये घेणे थांबवावे. अशी मागणी करण्यात आली. सिडकोच्या प्रशासक विद्या मुंडे, अनिल पोलकर, विश्वनाथ स्वामी, राजू खरे, किशोर नागरे, नगररचना विभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सिडको, हडको, वाळूज महानगर परिसरातील धार्मिक स्थळे रेडिरेकनरच्या वीस टक्के रक्कम भरून नियमित करावेत, अशी मागणी खा. खैरे यांनी केंद्रेकर यांच्याकडे केली. यावर मंत्रालय स्तरावर निर्णय अपेक्षित असल्याचे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.