साई महाविद्यालयाच्या निर्णयावर चर्चेचे गुऱ्हाळ
By Admin | Published: June 21, 2017 12:06 AM2017-06-21T00:06:26+5:302017-06-21T00:09:27+5:30
औरंगाबाद : वादग्रस्त ठरलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर मंगळवारी विद्यापीठाच्या विद्या परिषदेत चर्चेचे गुऱ्हाळच चालले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वादग्रस्त ठरलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर मंगळवारी विद्यापीठाच्या विद्या परिषदेत दिवसभर केवळ चर्चेचे गुऱ्हाळच चालले. रात्री सात वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. शेवटी बैठक स्थगित करीत ती उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बोलावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते, तर प्रभारी अधिष्ठातांसह उच्च शिक्षण, तसेच तंत्रशिक्षणचे सहसंचालक उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वादग्रस्त ठरलेल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय बैठकीत ठेवण्यात आला होता. या बैठकीत यावर दिवसभर चर्चा करण्यात आली; मात्र कोणत्याही निर्णयावर एकमत झाले नाही. शेवटी सायंकाळी सात वाजल्यामुळे बैठक स्थगित करीत उद्या, बुधवारी घेण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
‘त्या’ महाविद्यालयाच्या
संलग्नीकरणाला आक्षेप
अकरा वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कन्नड तालुक्यातील मोहाडी येथील वरिष्ठ कला महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याविषयीचा अहवाल बैठकीत मांडण्यात आला आहे; मात्र त्यावर कोणाताही निर्णय झाला नाही. या महाविद्यालयाला संलग्नीकरण देण्यात येऊ नये, यासाठी अनेकांनी आक्षेप घेतले असल्याचे समजते. या आक्षेपांचे निवेदने कुलगुरूंना देण्यात आले आहे. यामुळे त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी एका संघटनेने कंत्राटच घेतले असून, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुनर्संलग्नीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.