डेंग्यूसदृश आजारांचा जिल्ह्याला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:18 AM2017-09-03T00:18:10+5:302017-09-03T00:18:10+5:30
जिल्ह्याला आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजारांनी विळखा घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्याला आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजारांनी विळखा घातला आहे. जिल्ह्यामध्ये महिनाभरात ६३ संशयित रुग्ण आढळले. यामध्ये तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºयांची संख्या लक्षात घेता संशयित रुग्णांचा आकडा वाढू शकतो; परंतु आरोग्य यंत्रणा परिस्थिती चिंताजनक नसल्याचाच दावा करीत आहे.
मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील १२ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूसदृश आजाराने गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण ६ रुग्ण समोर आले होते. यामध्ये २ ग्रामीण तर ४ शहरातील होते. सात महिन्यांच्या कालावधीत ६ रुग्ण आढळले; परंतु आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ झाली.
आॅगस्टमध्ये पडलेल्या पावासामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागला. त्यामुळे अनेकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली.
जिल्ह्यातील ६३ संशयित रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतील ३२ रुग्णांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात एक तर शहरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. हे तिन्ही रुग्ण आॅगस्टमधील आहेत. डेंग्यूसदृश आजाराने कोणाचा मृत्यू झाला, याची माहिती प्राप्त झालेली नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील म्हणाले.
पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर देण्यात आला. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले, तरीही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले.