विदारक ! खरबूज शेतातच सडतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:05 AM2021-05-05T04:05:46+5:302021-05-05T04:05:46+5:30
कायगाव : परिसरातील खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना कमी झालेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतातील ...
कायगाव : परिसरातील खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना कमी झालेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतातील खरबूज काढून विकणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातच खरबूज सडत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
दरवर्षी १८ ते २० रुपये किलोने ठोक बाजारात विक्री होणाऱ्या खरबुजाला यंदा फक्त ७-८ रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरबूज काढून बाजारात नेण्यासाठी एका खेपेला सुमारे ८ ते १० हजारांचा वाहतूक खर्च येतो. तर शेतातून काढून गाडी भरण्यासाठी सुमारे १८००-२००० रुपये मजुरी लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी मिळणाऱ्या भावामुळे खरबूज विकणे तोट्याचे ठरू लागले आहे. परिणामी, परिसरातील अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब, धनगरपट्टी भागातील शेतकऱ्यांनी खरबूज काढून बाजारात विकणे बंद केले आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांचे खरबूज शेतातच सडत आहे. यावर्षी खरबुजाला भरपूर माल लागला होता. जवळपास सगळ्या शेतकऱ्यांच्या खरबूजवाड्यात चांगले पीक बहरले होते. मात्र, भावामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
कायगाव परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर, लखमापूर, धनगरपट्टी आणि गळनिंब आदी शिवारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरबूज शेती केली जाते.
दरवर्षी परिसरातील खरबूज औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर, श्रीरामपूर, वाशी, ठाणे, भिवंडी, नाशिक आदी बाजारात पाठवले जाते.
लॉकडाऊन असल्याने खरबुजाला किरकोळ बाजारात उठाव नाही. किरकोळ बाजारात माल विकला जात नसल्याने व्यापारी माल विकत घेण्यासाठी तयार होईना. त्यामुळे खरबुजाला यावर्षी कमी भाव मिळत आहे.
- बाळू बोकडिया, खरबूज उत्पादक, अगरवाडगाव.
फोटो :
खरबूज बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने धनगरपट्टी परिसरातील खरबुजाच्या वाडीत माल पडून सडत आहे. (तारेख शेख)
030521\tarekh ahemad usuf shaikh_img-20210501-wa0014_1.jpg
खरबूज बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने धनगरपट्टी परिसरातील खरबुजाच्या वाडीत माल पडून सडत आहे. (तारेख शेख)