करोडीत रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:54 PM2019-03-25T22:54:23+5:302019-03-25T22:54:33+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील करोडी शिवारात छुप्या पद्धतीने रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असून, यामुळे जमिनीतील पाणी ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील करोडी शिवारात छुप्या पद्धतीने रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असून, यामुळे जमिनीतील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी कैलास बल्हाळ याला पकडून चोप दिला. त्यावेळी बाळू थोरात याने टँकरने पाणी आणून टाकल्याची माहिती त्याने दिली.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडासह परिसरातील शेतात छुप्या पद्धतीने रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरु आहेत. याविषयीचे वृत्त प्रकाशित करुन लोकमतने हा प्रकार वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी घाणेगाव शिवरातील एका शेतात रसायनयुक्त सांडपाणी सोडताना रंगेहात टँकर पकडून तो पोलिसांच्या स्वाधिन केला होता. दरम्यान, आसेगाव येथील कैलास बल्हाळ याने करोडी शिवारातील गट नं. १३५ या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन शेती व्यवसाय सुरु केला आहे. या गटनंबरमधील जमिनीवर काही दिवसांपासून बल्हाळ याच्या सांगण्यावरुन रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात आहे.
जागोजागी या सांडपाण्याचे डबके साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अधिकच उग्र वास सुटल्याने सोमवारी गावातील देविदास गवांदे, साहेबराव जाधव, देविदास गडगुळ, लक्ष्मण जाधव, रमेश नवले, भारत जाधव, नामदेव नवले, ज्ञानेश्वर गोल्हार, चंद्रभान जाधव, मंगेश जाधव आदी ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला. बल्हाळ याच्या शेतात हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बल्हाळ याला चोप दिला.