महावितरणचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर
By Admin | Published: June 16, 2016 11:47 PM2016-06-16T23:47:35+5:302016-06-17T00:35:34+5:30
बीड : पावसाळापूर्व महावितरणची दुरुस्ती कामे झालीच नाहीत. मध्यंतरीच्या वादळी-वाऱ्याने मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून,
बीड : पावसाळापूर्व महावितरणची दुरुस्ती कामे झालीच नाहीत. मध्यंतरीच्या वादळी-वाऱ्याने मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, विद्युत खांब व तारांच्या पडझडीमुळे जनावरेही दगावली आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याभरात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
हंगामपूर्व दुरुस्तीची कामे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ शहरी भागात होत आहेत. ग्रामीण भाग महावितरणने वाऱ्यावर सोडल्याने मान्सूनपूर्व पावसातच पडझडीचे प्रमाण वाढले आहे. मे महिन्याअखेर झालेल्या वादळी वाऱ्यात उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे सुमारे ४५० विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते. यामध्ये महावितरणने कोट्यवधीचे नुकसान झाले असून गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून बीड तालुक्यातील करचुंडी येथील छावणीतील तब्बल २१ जनावरे तर परळी तालुक्यातील तळणी येथे विजेच्या धक्का लागून तीन जनावरे दगावल्याची घटना बुधवारी घडली.
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे फ्रिजमध्ये विद्युतप्रवाह संचारल्याने शेख नजीर शेख व अलिशान शेख नजीर या दोघांचा मृत्यू झाला होता. बीड तालुक्यातील नेकनूर येथे विद्युत तारेच्या धक्क्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक दुर्घटना होत असतानादेखील महावितरणने गांभिर्याने पाहिल नाही. तालुक्याची ठिकाणे वगळता ग्रामीण भागात आजही दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. वादळी वाऱ्याला सुरुवात होताच विद्युत खांबाची पडझड हे समीकरणच बनले आहे.
यंदा महावितरणने हंगामपूर्व दुरूस्ती कामाच्या निविदाच काढल्या नव्हत्या. नुकसान झाल्यानंतर उपकेंद्रानुसार ५० लाखाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. असे असून दुरूस्तीचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने गावे अंधारात आहेत. (प्रतिनिधी)