राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्यास बडतर्फ करा; सकल मराठा समाजातर्फे मागणी
By राम शिनगारे | Published: July 17, 2024 07:37 PM2024-07-17T19:37:26+5:302024-07-17T19:38:05+5:30
विद्यापीठातील संचालक राजीनामा प्रकरण : विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी राज्यपालांच्या सचिवांना उद्देशून पत्र लिहिले आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्यावर कारवाईसाठी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी राजभवनाच्या सचिवांकडून मार्गदर्शन मागविले आहे. याविषयी सकल मराठा समाजाकडून कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेत डॉ. सानप यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती.
विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ यांनी दिलेल्या राजीनामा प्रकरणात आता सकल मराठा समाजाने उडी घेतली आहे. सकल मराठा समाजाकडून प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सुनील कोटकर, संदीप जाधव, रेखा वहाटुळे, लक्ष्मण नवले आदींनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची सोमवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, डॉ. सानप यांनी ५ जुलैला प्रकुलगुरूंच्या दालनात बोलावून घेत डॉ. वाघ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. डॉ. वाघ यांच्या मते “महाविद्यालयांना विस्तार विभाग देताना टक्केवारी घेता का..? व्याख्याने तुम्ही एकटेच कसे देता..? तुमची चौकशीच लावतो. चौकशी समितीचा अध्यक्षही मीच होतो. तुम्हाला नोकरीहून काढतो. माझी मंत्रालयापर्यंत ओळख आहे,” अशा शब्दांत डॉ. सानप यांनी धमकावले. त्यामुळेच डॉ. वाघ यांनी प्रभारी संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे डॉ. सानप यांना बडतर्फ करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यापीठाचे राजभवनाला पत्र
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी राज्यपालांच्या सचिवांना उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ‘निवेदनात नमूद मुद्यांच्या आधारे विद्यापीठ स्तरावर काय कारवाई करण्यात यावी. याबाबत आपले मार्गदर्शन कार्यालयास सादर करावे.’
जातीय संघटनांनी निवेदन देणे दुर्दैवी
या विषयांमध्ये जातीय संघटनांनी निवेदन देणे हे दुर्दैव आहे. शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी जात आणि जातीय संघटनांचा वापर करणे योग्य नाही. विद्यापीठाने राजभवनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यात राजभवनने योग्य चौकशी करून कार्यवाही करावी.
.-डॉ. गजानन सानप, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य.