संत एकनाथ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:44 AM2018-04-24T00:44:03+5:302018-04-24T00:44:48+5:30

कारखाना चालवताना सहकार कायद्याचे उल्लंघन करणे व आर्थिक अनियमितता करून संस्थेच्या हितास बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवून संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत. दरम्यान, कारखान्याचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Dismissal of Board of Directors of Saint Eknath Factory | संत एकनाथ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त

संत एकनाथ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : कारखाना चालवताना सहकार कायद्याचे उल्लंघन करणे व आर्थिक अनियमितता करून संस्थेच्या हितास बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवून संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत. दरम्यान, कारखान्याचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यंदा संचालक मंडळाने नाशिक येथील शीला अतुल शुगर टेक या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला आहे. यावर्षी संत एकनाथ कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला असून, जवळपास दोन लाख पन्नास हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ‘संत एकनाथ’च्या संचालक मंडळाने नियमबाह्य संत एकनाथ कारखाना शीला अतुल टेक या कंपनीला चालवण्यासाठी दिला व संस्थेचे आर्थिक नुकसान केले, अशी तक्रार ‘संत एकनाथ’चे संचालक विक्रम घायाळ व कोंडीराम एरंडे यांनी सहनिबंधक सहकारी संस्था, राज्य साखर आयुक्तांकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन चौकशीअंती ‘संत एकनाथ’च्या संचालक मंडळावर कारखाना संचालक मंडळाने संस्थेच्या हिताविरुद्ध कृत्य करणे, संचालक मंडळ वैधानिक कार्य पार पाडत नाही, संचालक मंडळाने गंभीर वित्तीय आर्थिक नियमबाह्य कामे केल्याने संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे, संचालक मंडळाने बेकायदेशीर कृत्य केल्याने संस्थेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे आदी कारणे दाखवून नीलिमा गायकवाड (सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक साखर प्रादेशिक विभाग औरंगाबाद) यांनी कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. सदरील आदेश २१ एप्रिल रोजी निर्गमित केले असून, विलास सोनटक्के (प्रथम विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था औरंगाबाद) यांची संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बरखास्त संचालक मंडळामध्ये चेअरमन तुषार पा. शिसोदे, व्हा. चेअरमन भास्करराव राऊत, संचालक अप्पासाहेब पाटील, हरिभाऊ मापारी, आबासाहेब मोरे, ज्ञानेश औटे, आसाराम शिंदे, प्रल्हाद औटे, माजी आमदार संजय वाघचौरे, गोपीकिशन गोर्डे, दत्तात्रय आमले, अक्षय शिसोदे, कचरूबोबडे, मुक्ताबाई बोरडे, अहिल्याबाई झारगड, शिवाजी घोडके, विजय गोरे, अण्णासाहेब कोल्हे, प्रकाश क्षीरसागर यांचा समावेश आहे.
तीन महिन्यांत कारखान्याला दुसरा दणका
कारखान्याचे संचालकपद रद्द झालेले विक्रम घायाळ व ज्येष्ठ नेते कोंडीराम एरंडे यांच्या तक्रारीवरून राज्य साखर आयुक्त कार्यालयाने आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत तीन महिन्यांपूर्वी ‘संत एकनाथ’च्या संचालक मंडळाला ९ कोटी चार लाख १० हजार रुपये दंड केला होता. सदरील प्रकरण प्रलंबित असताना सहनिबंधक व सहसंचालकांनी हा दुसरा दणका संचालक मंडळाला दिल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सहकारमंत्र्यांकडे
दाद मागणार
शेतकरी व कामगार यांचे हित लक्षात घेता कारखाना चालू करणे गरजेचे होते. त्यामुळे शीला अतुल शुगर टेकच्या सहकार्याने कारखाना चालू केला. या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने चांगले साखरेचे उत्पादन घेतले. मात्र, काही मंडळींनी कारखाना बंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. बरखास्तीच्या आदेशाविरोधात सहकारमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. ऊस बिलापोटी शेतकऱ्यांची जी देणी बाकी आहे. ती चुकती केली जाईल.
-तुषार शिसोदे, चेअरमन,
संत एकनाथ

Web Title: Dismissal of Board of Directors of Saint Eknath Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.