जलकुंभांची स्थिती विदारक
By Admin | Published: July 8, 2016 11:47 PM2016-07-08T23:47:08+5:302016-07-08T23:50:57+5:30
औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.
औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छतेअभावी अनेक टाक्यांमध्ये अक्षरश: कचरा आणि घाण साचली आहे. बऱ्याच टाक्यांची वरची झाकणेच गायब झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ या टाक्यांमध्ये पडते आहे. या सर्व कारणांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही विदारक परिस्थिती समोर आली. संपूर्ण शहराला पिण्यासाठी मनपाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता स्वतंत्र जलवाहिन्यांद्वारे जायकवाडी धरणातून आधी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. या ठिकाणी विविध प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी शहरातील जलकुंभांमध्ये पोहोचविले जाते. मात्र यानंतर हे पाणी शुद्धच राहत असल्याचा समज चुकीचा असल्याची बाब गुरुवारी समोर आली.
लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील क्रांतीचौक, कोटला कॉलनी, गिरिजादेवी हाऊसिंग सोसायटी, दिल्लीगेट, ज्युबली पार्क, रेल्वेस्टेशन, पुंडलिकनगर, सेव्हन हिल, ज्योतीनगर, शहागंज, सिडको एन- ७ यांसह शहरातील विविध जलकुंभांची पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बहुतेक जलकुंभांवरील लोखंडी झाकण गायब झाले आहेत. त्यामुळे हवेतील धूळ, कचरा तसेच पावसाचे पाणी थेट या जलकुंभात जात आहेत. बऱ्याच ठिकाणी तळाला माती आणि कचरा साचलेला आहे. तर काही ठिकाणी शेवाळही आले आहेत.
नियमानुसार जलकुंभांची ठराविकपणे स्वच्छता करणे अपेक्षित आहे. मात्र मनपाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या वॉटर युटिलिटी कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
क्रांतीचौक, कोटला कॉलनी, शहागंज, दिल्लीगेट, ज्युबली पार्क आदी ठिकाणी जलकुंभांवर दर्शविलेली स्वच्छतेची तारीख केव्हाच निघून गेलेली आहे. परंतु त्यानंतरही स्वच्छता झालेली नसल्याचे आढळून आले. फारोळा येथून शहरात शुद्ध पाणी येत असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचताना पुन्हा दूषित होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
स्वच्छतेच्या तारखा नावालाच
प्रत्येक जलकुंभाची सहा महिन्यातून एकदा स्वच्छता होणे अपेक्षित आहे. स्वच्छता कधी केली गेली आणि पुढची स्वच्छता कधी करणार याच्या तारखा जलकुंभावर नोंदविणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जलकुंभांवर या तारखांची नोंदच नसल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी नोंदी असल्या तरी स्वच्छता करण्याची तारीख कधीच निघून गेलेली असली तरी अद्याप स्वच्छता झालेली नसल्याचे दिसून आले.