रसायनयुक्तसांडपाण्याची वसाहतीत विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 07:31 PM2018-12-25T19:31:14+5:302018-12-25T19:31:28+5:30
सिडको वाळूजमहानगर परिसरातील नागरी वसाहतीत रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वाळूज महानगर : सिडकोवाळूजमहानगर परिसरातील नागरी वसाहतीत रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडको प्रशासनाने चार दिवस या परिसरात पाहणी करुन सांडपाण्याचे नमुने घेतले असून, यासंदर्भात प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिडको वाळूजमहानगर परिसरातील नागरी वसाहतीत चेंबरमध्ये रसायनयुक्त सांडपाणी काही दिवसापासून चोरी-छुपे सोडले जात आहे. रसायनयुक्त सांडपाणी मुख्य रस्त्याच्याकडेला व नागरी वसाहतीलगत साचत असल्यान दुर्गंधी पसरत आहे. आठवडाभरापूर्वी रहिवाशांनी सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी भेट घेऊन या प्रकाराची माहिती दिली. याप्रसंगी या भागातील चेंबरमध्ये औद्योगिक परिसरातील कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप नागेश कुठारे, दिनानाथ राठोड, सुनिल साळुंके, प्रभाकर धोत्रे, कृष्णा नागे आदींनी केला होता.
संबंधितांविरुध्द कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने चव्हाण यांच्याकडे केली होती. याप्रसंगी प्रशासक चव्हाण यांनी या परिसराची पाहणी करुन दोषीविरुध्द कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. सिडकोचे मुख्य प्रशासक मधुकरराजे आर्दड, प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी या परिसराची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे, सहायक कार्यकारी अभियंता हिवाळे, सहायक अभियंता मारुती नारनवरे, संतोष जाधव, अतिक्रमण पथकातील सदस्यांनी या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन २२ डिसेंबरपासून चार दिवस पाहणी केली. एका अनधिकृत चेंबरमध्ये रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सिडको करणार तक्रार
एका अनधिकृत चेंबरमधील सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. या पाण्याचे नमुने प्रदुषण मंडळाकडे तपासणीसाठी दिले जाणार असल्याची माहिती गजाजन साटोटे यांनी दिली. प्रदुषण मंडळाच्या अहवालानंतर सांडपाणी सोडणाºयाचा शोध घेऊन दोषीविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार असल्याचे सिडकोच्या अधिका-यांनी सांगितले.