भूखंडावरच कच-याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:47 AM2018-02-10T00:47:23+5:302018-02-10T00:47:28+5:30
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरलगत मोकळ्या भूखंडावरच कच-याची विल्हेवाट लावली जात आहे. कच-याच्या ढिगा-यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरलगत मोकळ्या भूखंडावरच कच-याची विल्हेवाट लावली जात आहे. कच-याच्या ढिगा-यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे. याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उद्योजक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासन व लगतचे काही कारखानदार आपला कचरा साजापूर गावालगतच वडगावकडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने कचरा जागेवरच सडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कारखानदारांकडून कच-याबरोबरच केमिकलयुक्त पदार्थ टाकले जात असल्याने दुर्गंधीत भर पडत आहे. दुर्गंधी व केमिकलयुक्त पदार्थामुळे वातावरण दूषित होऊन प्रदूषण वाढत आहे. शिवाय अनेकवेळा याच ठिकाणी कचरा जाळला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. गावालगतच कच-याची विल्हेवाट लावली जात असल्याने गावातील रहिवाशांसह येथून ये-जा करणा-या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कच-यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरे व कुत्र्याचा वावर वाढला आहे. येथून ये-जा करणा-याच्या पाठीमागे कुत्रे लागत असल्याने रात्रीच्या वेळी येणा-या जाणा-या पादचारी व वाहनधारकामध्ये भीती पसरली आहे. शिवाय बाजूलाच धार्मिक स्थळ व अनेक कारखाने आहेत. दर्शनासाठी येणा-या भाविकांना व कंपनीत येणा-या उद्योजकासह कामगारांना या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मोकळ्या भूखंडावर कच-याची विल्हेवाट लावणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भागातील त्रस्त उद्योजक व नागरिकांमधून केली जात आहे.