अवैध गर्भपाताच्या विल्हेवाटीसाठी थेट रुग्णांच्या बेडखालीच चेंबर, ड्रेनेजलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:22 PM2019-02-05T23:22:31+5:302019-02-05T23:23:01+5:30
शहरात अवैध गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटने पाताळयंत्री सुविधा तयार केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली. अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करणारी डॉक्टरांची टोळी २२ जानेवारी रोजी जेरबंद केल्यानंतर मंगळवारी त्यातील डॉ. वर्षा राजपूत (शेवगण) यांच्या सिडको एन २ येथील विमल माता बाल रुग्णालयाची झडती घेणाºया मनपा व पोलीस पथकाला रुग्णांच्या खोलीतील प्रत्येक बेडखालीच एक चेंबर (ड्रेनेजलाईन) असे चार चेंबर आढळून आले.
औरंगाबाद : शहरात अवैध गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटने पाताळयंत्री सुविधा तयार केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली. अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करणारी डॉक्टरांची टोळी २२ जानेवारी रोजी जेरबंद केल्यानंतर मंगळवारी त्यातील डॉ. वर्षा राजपूत (शेवगण) यांच्या सिडको एन २ येथील विमल माता बाल रुग्णालयाची झडती घेणाºया मनपा व पोलीस पथकाला रुग्णांच्या खोलीतील प्रत्येक बेडखालीच एक चेंबर (ड्रेनेजलाईन) असे चार चेंबर आढळून आले.
हे चेंबर व ड्रेनेजलाईन पथकाने जेसीबीने खोदले. तपास पथकाने संशयास्पद आढळलेली माती व इतर साहित्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेला पाठविले जाणार आहेत. गर्भलिंग निदान करणारे डॉ. सूरज सूर्यकांत राणासह ९ आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे. या टोळीतील डॉ. वर्षा राजपूत (शेवगण) यांना सिल्लोड परिसरातून अटक करण्यात आली. त्यांचेच हे विमल मदर अॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल असून, तेथेही अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करून विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती समोर आली. त्यानुसार मनपा आरोग्य विभागाच्या डॉ. नीता पाडळकर, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांच्या टीमने जालना रोडवरील सिडको एन-२ येथील दवाखान्याची झडती घेतली. तेव्हा पेशंटच्या रूममधील गुप्त चेंबर समोर आले.
असे आहेत चेंबर
विशेष म्हणजे इमारतीच्या बांधकामातच हे चेंबरही बांधण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलमधील एका रूममध्ये प्रत्येकी दोन असे दोन रूममध्ये चार लहान चेंबर आहेत. हे चेंबर पेशंटच्या बेडखाली असल्याने सहज कुणाला दिसून येत नाहीत. या दोन रूमचे आऊटलेट बाहेरील मोठ्या चेंबरला जोडले आहे. मोठे चेंबर किमान दहा फुटांपेक्षा अधिक खोल आहे. मोठ्या चेंबरचे आऊटलेट मनपाच्या मेन लाईनला जोडलेले आहे.
खोदकाम आणि टीम आश्चर्यचकित
मनपाचे कर्मचारी जेसीबी घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिमेंटखाली दडलेले चेंबर जेसीबीने खोदून काढले. मॅनहोलचे झाकण उघडले असता चेंबरला इतर दोन लाईन जोडलेल्या दिसल्या. त्याचा शोध घेतला तेव्हा त्या रूममधील चेंबरपर्यंत जोडलेल्या दिसल्या; परंतु सध्या या लाईन स्वच्छ धुतल्यासारख्या दिसत होत्या. त्यामुळे त्यात काही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु मनपाच्या बांधकाम परवान्यात अशा स्ट्रक्चरला परवानगी नसते. दवाखान्याच्या आवारात असे संशयास्पद चेंबर बांधण्याचे कारण स्पष्टच होते.
डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरात अवैध गर्भपात करून विल्हेवाट लावली जाते, या माहितीवरून २२ जानेवारीला डॉ. सूरज सूर्यकांत राणा यांच्यासह आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अवैध गर्भपात केंद्राची शोधमोहीम सुरू आहे. डॉ. वर्षा राजपूत यांच्या या दवाखान्यात मंगळवारी शोध घेण्यात आला. अजून शहरात बहुतांश ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
अवैधरीत्या गर्भपात व विल्हेवाट
सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे म्हणाल्या की, आतापर्यंत अवैधरीत्या गर्भलिंग निदान, तसेच विल्हेवाट प्रकरणात ९ जणांना अटक केलेली असून, त्यात चार डॉक्टर तसेच महिलाचे तीन नातेवाईक आणि एक लॅब टेक्निशियन आहे. या कारवाईत गुप्तता पाळली जात असून, या रॅकेटचे धागेदोरे शहरात अजून कुठे कुठे पसरलेले आहेत, त्याचा माग काढला जात आहे. दवाखान्यात अवैधरीत्या गर्भपाताची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे चेंबरच्या संशयास्पद रचनेवरून दिसते. पाणी टाकून ते स्वच्छ केले असले तरी बनावट रचनेवरून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो, त्यानुसार शोधमोहीम सुरू आहे.
जालना रोडवर गर्दी
दवाखान्यासमोर पोलिंसाच्या उपस्थितीत जेसीबीने खोदकाम सुरू केल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. वॉर्डातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले होते. नेमकी काय कारवाई आहे, अशी विचारणा सतत सुरू होती. गर्दी वाढल्याने पुढील चेंबरचे खोदकाम रखडले. दवाखान्याला कुलूप लावण्यात आलेली आहे. सीसीटीव्हीदेखील दवाखान्यासमोर असून, त्याचे फुटेज पोलीस तपासणार आहेत.
क
अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात डॉ. सुनील बाळासाहेब पोते, डॉ. नईमुद्दीन रफिक शेख व राजेंद्र काशीनाथ सावंत यांना अटक करून मंगळवारी (दि. ५) न्यायालयात हजर केले असता, त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले.
या प्रकरणात डॉ. सुनील बाळासाहेब पोते (५७, रा. कॅनॉट प्लेस, तुलसी आर्केड, सिडको एन-६), डॉ. नईमुद्दीन रफिक शेख (४८, रा. खेडगाव, ता. अंबड, जि. जालना) व राजेंद्र काशीनाथ सावंत (३५, हर्सूल) यांना अटक करण्यात येऊन मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. हे प्रकरण गंभीर असून, अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.