घाटीतच नियमांची ‘विल्हेवाट’

By Admin | Published: October 8, 2016 01:09 AM2016-10-08T01:09:54+5:302016-10-08T01:18:50+5:30

संतोष हिरेमठ , औरंगाबाद वैद्यकीय घनकचऱ्यातून (बायोमेडिकल वेस्ट) आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णालयांमधील वैद्यकीय घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

'Disposal of the Valley' rules | घाटीतच नियमांची ‘विल्हेवाट’

घाटीतच नियमांची ‘विल्हेवाट’

googlenewsNext


संतोष हिरेमठ , औरंगाबाद
वैद्यकीय घनकचऱ्यातून (बायोमेडिकल वेस्ट) आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णालयांमधील वैद्यकीय घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. घाटी रुग्णालयात मात्र, याला सर्रास हरताळ फासला जात आहे. वैद्यकीय घनकचरा थेट मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला फेकला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विविध भागांतून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णसेवेतून दररोज शेकडो किलो वैद्यकीय घनकचरा जमा होतो. वैद्यकीय घनकचरा आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. त्यामुळे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घाटी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ‘इन्सिनरेटर’ बसविले. यामध्ये टाकलेला कचरा उच्च उष्णतेमुळे जळतो. याचे आरोग्यावर कोणतेही परिणाम होत नाहीत. प्रारंभी या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. परंतु मध्यंतरी ही यंत्रणा बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा सुरू झालेली नाही. त्यामुळे आजघडीला घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची वेळ येत आहे.
घाटी रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात घनकचरा जमा होत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहत आहे. परंतु हे आव्हान योग्य पद्धतीने पार पाडण्याऐवजी रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. विविध विभागांमधून जमा होणारा कचरा पिशव्यांमध्ये संकलित करून थेट मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला फेकला जात आहे. सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, काढलेले प्लास्टर, तपासणी केलेल्या रक्ताच्या बाटल्या, वापरलेले रबरी हातमोजे आदी घनकचऱ्याचा ढीग याठिकाणी मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. याचा सर्वाधिक त्रास मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे नातेवाईकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कचऱ्याचे वेगवेगळे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. वॉर्डामधील कर्मचारी त्याचे वर्गीकरण करीत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे म्हणत घाटी प्रशासनाने हात झटकले. १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले. ६ आॅक्टोबरपासून कचरा उचलला जात असून, दोन दिवसांत ५ ट्रक कचरा उचलल्याचेही सांगण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषामुळे इन्सिनरेटर यंत्रणा बंद पडल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयातील घनकचरा इन्सिनरेटरमध्ये प्रक्रिया करून जाळला जात होता. परंतु इन्सिनरेटर बंद पडले. सध्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंपनीला कंत्राट दिले असून, दररोज कचरा उचलला जात आहे. काळ्या पिशव्यांमध्ये घनकचरा जमा केला जात नाही. मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाजवळील कचरा नियमित उचलला जातो. एखाद्या वेळी त्यामध्ये खंड पडतो.
-डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय
कचरा संकलित करून मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला फेकणारे अनेक कर्मचारी मास्क, हातमोजे, बूट वापरत नसल्याचे दिसते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात इंजेक्शन, सलाईन पडलेले दिसून येतात. कर्मचाऱ्यांकडून कचरा फेकला जात असताना प्रशासनाचे त्याक डे साधे लक्षही जात नाही. कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.
घाटीतील ओला-सुका कचरा (सॉलिड वेस्ट) काळ्या पिशवीत जमा केला जातो. वैद्यकीय घनकचरा कंत्राट दिलेली कंपनी संकलित करीत असल्याचे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात काळ्या पिशव्यांमध्ये सर्रास वैद्यकीय घनकचरा जमा केला जात असल्याचे दिसत आहे. मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाजवळ फेकलेल्या अनेक काळ्या पिशव्यांमध्ये इंजेक्शन, रक्ताच्या बाटल्या आदी दिसून आल्या.

Web Title: 'Disposal of the Valley' rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.