महापालिका प्रशासक अन् एमआयएमच्या माजी नगरसेवकांत खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 05:42 PM2022-12-21T17:42:25+5:302022-12-21T17:43:49+5:30
प्रशासन नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही, त्यामुळे विरोधात जनआंदोलन करण्याची घोषणा एमआयएमने केली.
औरंगाबाद : महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे. प्रशासक आणि एमआयएमच्या माजी नगरसेवकांमध्ये सोमवारी संध्याकाळी जोरदार खडाजंगी झाली. चौधरी यांच्याकडून मागील काही दिवसांपासून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असून, विकासकामे ठप्प झाली आहेत. प्रशासन नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही. त्यामुळे विरोधात जनआंदोलन करण्याची घोषणा एमआयएमने केली.
२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तत्कालीन प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रत्येक वॉर्डात १ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येतील, अशी घोषणा केली. त्यांच्या बदलीनंतर डॉ. चौधरी यांनी विकासकामांना ब्रेक लावला. १ कोटींची कामे ६० लाखांवर आणली. ही कामेही होत नाहीत. रखडलेल्या विकासकामांसंदर्भात सोमवारी सायंकाळी एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक प्रशासकांच्या भेटीला महापालिकेत पोहोचले. त्यांना बराच वेळ थांबविण्यात आले. त्यानंतर सर्वांना कक्षात प्रवेश देण्यात आला. खुर्च्या ओढून बसताना माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी यांच्याकडून एक खुर्ची पडली. त्यावर चौधरी रागाच्या भरात ‘ही कोणती पद्धत,’ असे म्हणाले. सिद्दिकी व चौधरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अपमानामुळे सिद्दिकी कक्षातून बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने अन्य नगरसेवकांनी त्यांना समजूत घालून परत आणले. दहा मिनिटे विकासकामांवर चर्चा झाली. कपात केलेला निधीही नंतर देण्याचे आश्वासन डॉ. चौधरी यांनी दिले.
अपमानाची तिसरी वेळ
पहिल्यांदा जेव्हा एमआयएमचे नगरसेवक प्रशासकांना भेटायला गेले, तेव्हा डॉ. चौधरी यांनी ‘तुम्ही माजी नगरसेवक आहात,’ म्हणून डिवचले. ‘विकास निधीवर तुमचा हक्क नाही, आम्ही आमच्या हिशेबाने काम करू,’ असे सुनावले. दुसऱ्यांदा भेटायला गेले तेव्हा शिष्टमंडळाला तासभर बाहेर उभे केले. कक्षात गेल्यावर, ‘मी घरचे काम करीत नव्हतो,’ असे डॉ. चौधरी यांनी सांगितले. माजी नगरसेवकांनीही, ‘आम्हीसुद्धा आमचे घरचे काम घेऊन आलो नाही,’ अशा शब्दात सुनावले.
आम्ही रस्त्यावर उतरणार
बुढीलेन, औरंगपुरा, चंपाचौक येथील रस्ते, ड्रेनेज आदी प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही प्रशासकांकडे पाठपुरावा करतोय. ते अजिबात सहकार्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत.
- नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक, एमआयएम