तंटामुक्त गाव समित्या बनल्या नामधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:02 AM2021-09-26T04:02:56+5:302021-09-26T04:02:56+5:30
समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गावागावात राजकीय वाद : चापानेर : गावागावातील वादविवाद, भांडणे गावातच समोपचाराने सोडविण्यात यावी, या चांगल्या उद्देशाने ...
समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गावागावात राजकीय वाद :
चापानेर : गावागावातील वादविवाद, भांडणे गावातच समोपचाराने सोडविण्यात यावी, या चांगल्या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून तंटामुक्ती ग्राम समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून गावागावातील भांडण सोडविले जाऊ लागले. परंतु अलिकडच्या काळात शासनाच्या उदासीन धोरणामुळे गावागावातील तंटामुक्ती समित्या गायब झाल्या आहेत. तर काही गावात असलेल्या समित्या फक्त नावापुरत्याच असतात.
तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला राजकीय स्वरूप येऊ लागली होती. तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावल्यामुळे पोलीस विभागावरील कामाचा व्याप वाढला आहे. चापानेर परिसरातील काही गावातील तंटामुक्त समित्यांचा अपवाद वगळता बहुतांश गावातील समित्या सक्रिय दिसून येत नाही. कागदोपत्री समिती मर्यादित आहे. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला खीळ बसली गेली आहे. असे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
-----
लाखो रूपये प्रोत्साहनपर बक्षिसे
गावागावातील वाद समोपचाराने मिटवल्याने शासनाकडून प्रोत्साहनपर बक्षीस दिले गेली. तर पोलिसांच्या कामकाजात मोलाचा वाटा दिला. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गावातील तंटामुक्ती समित्या पडद्याआड झाल्या आहेत. तर गावागावातील वाद पोलीस ठाण्यात गेल्याने पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे.