गोंधळात उरकले उड्डाणपुलाचे नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:21 AM2018-05-28T01:21:16+5:302018-05-28T01:22:26+5:30
सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला. या कार्यक्रमास विरोध करीत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दोन वर्षांपूर्वी सिडकोतील उड्डाणपुलास वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने घेतला होता. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास या पुलाचा नामकरण सोहळा आयोजित केला होता. तत्पूर्वीच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते सिडको उड्डाणपुलाच्या ठिकाणी जमा झाले व या पुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. तेव्हा महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट यांनी बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मग उड्डाणपुलाचा नामकरण सोहळा पार पडला.
यावेळी खा. चंद्रकांत खैरे, उपमहापौर विजय औताडे, किसनचंद तनवाणी, विकास जैन, सभापती गजानन बारवाल, देवजीभाई पटेल, दयाराम बसैये, आनंद तांदुळवाडीकर, अनिल पैठणकर, भाऊ सुरडकर, भाऊसाहेब जगताप आदींच्या
प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, दत्ताभाऊ राठोड, विकास जाधव, रविराज राठोड, सुनील चव्हाण या कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलास वसंतराव नाईक यांचेच नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या साहाय्याने आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पुलाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी यावेळी गोरसेनेच्या वतीने डॉ. जीवन चव्हाण, मधुकर पवार, योगिराज राठोड, डॉ. विलास राठोड, विशाल राठोड, राजू चव्हाण, मिथुन पवार, दिगंबर राठोड या पदाधिका-यांनी निदर्शने केली.
भावना दुखाविण्याचा
प्रश्नच नाही
नामकरण सोहळ्याप्रसंगी खा. खैरे म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्याविषयी आम्हालाही आदर आहे. महापालिकेने सावरकर यांचे नाव उड्डाणपुलाला देण्याबाबतचा ठराव घेतला होता. त्यामुळे कोणाच्या भावना दुखाविण्याचा प्रश्नच नाही. याचवेळी महापालिकेच्या पदाधिकाºयांनी मात्र, या पुलावर दोन्ही महापुरुषांची नावे कोरण्याचा अफलातून तोडगा काढला.