नवीन वर्षाच्या पार्टीत तरुणीसोबत नाचण्यावरून राडा; हाॅटेलमधील गोंधळ आला रस्त्यावर
By राम शिनगारे | Published: January 1, 2024 01:21 PM2024-01-01T13:21:45+5:302024-01-01T13:35:27+5:30
एका हाॅटेलमधील गोंधळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे नियंत्रणात
छत्रपती संभाजीनगर : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठेसह हॉटेलमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. सेव्हन हिल परिसरातील सिल्व्हर इन हॉटेलमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीमध्ये नाचण्यावरून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाद झाला. हा वाद थेट रस्त्यावर पोहोचला. शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांनी सायंकाळी ६ वाजेपासूनच वाहनांच्या तपासणीला सुरुवात केली होती. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी क्रांतीचौकात नाकेबंदी केली होती. त्याशिवाय इतरही सर्व सहायक पोलिस आयुक्त, निरीक्षकांसह इतर अधिकारी रस्त्यावर होते. ११.३० वाजेच्या सुमारास सिल्व्हर इन हॉटेलमध्ये आयोजित पार्टीमध्ये तरुणीसोबत नाचण्यावरून वाद सुरू झाला. त्यात विशिष्ट धार्मिक घोषणाबाजी करण्यात आल्याचाही आरोप सुरू झाला.
पार्टीमधून हा वाद थेट सेव्हन हिल उड्डाणपुलास सुरुवात होते, त्याठिकाणी आला. मोठ्या प्रमाणात तरुणांचा गोंधळ, शिवीगाळ सुरू असतानाच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांचे पथक आले. त्यांनी जमलेल्यांना पांगवले. मात्र, गर्दी जास्त असल्यामुळे नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रावसाहेब काकड, गणेश माने आदी पोहोचले. त्यांनी पार्टी थांबवत युवकांना बाहेर काढले. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, अशोक थोरात यांच्यासह इतर पथकेही घटनास्थळी पोहोचली.
सेव्हन हिल उड्डाणपुलावर अपघात
रात्री १२:१५ वाजता सेव्हन हिल उड्डाणपुलावर वेगात असलेल्या चारचाकी गाडीने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून भरधाव आलेली दुचाकी तिच्यावर आदळली. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, बघ्यांच्या गर्दीमुळे थोडा वेळ वाहतूक खोळंबली होती.