दहा रुपयाच्या भाड्यावरून वाद, रिक्षाचालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 08:06 PM2021-12-15T20:06:41+5:302021-12-15T20:07:25+5:30
रिक्षाचालकाला अटक, एक दिवसांची पोलीस कोठडी
औरंगाबाद : रिक्षातुन उरतल्यानंतर प्रवाशाने नेहमीप्रमाणे १० रूपये भाडे दिले. ते भाडे घेण्यास रिक्षाचालकाने नकार देत पेट्रोल महागले आहे २० रुपये दे अशी मागणी केली. यातुन झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यात प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली.
मिर्झा मुजफ्फर हुसेन मिर्झा आली हुसेन वय ५२ रा. सईदा कॉलनी जटवाडा रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुजफ्फर हे मंगळवारी मिल कॉर्नर येथून कामाक्षी चौकात जाण्यासाठी रिक्षात ( एमएच २० इएफ ००१२) बसले. साडेसहा वाजेच्या सुमारास चौकात उतरल्यानंतर त्यांनी नेहमीपमाणे रिक्षाचालक सालम बिन उर्फ बाबा सुलेमान आलम बावजिरवय (वय ५०, रा.चेलीपुरा मुर्गी नाला) याला १० रुपये दिले. दिलेले १० रुपये घेण्यास नकार देत सालम बिन याने पेट्रोल महागल्यामुळे २० रुपये देण्याची मागणी केली. त्यातुन दोघात बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत सालम बिन याने मुजफ्फर यांच्या नाकावर ठोसा मारला. हा ठोसा जबर बसल्यामुळे त्यांच्या नाकातुन रक्त येऊ लागले. जखमी अवस्थेत ते घाटी रुग्णालयात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पुतण्याच्या तक्रारीवरून रिक्षाचालका विरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे करीत आहे.