तिकडे जन्मस्थळावरून वाद; इकडे मुस्लिमांनी पुढाकार घेत हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:29 PM2022-06-01T12:29:16+5:302022-06-01T12:30:28+5:30
हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरचा आदर्श, स्वखर्चाने गावातील हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार
- महेमूद शेख
वाळूज महानगर (औरंगाबाद) : गावात एकही हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरच्या ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. बुधवारी (दि.१) गावात साधू-संतांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
सध्या देशात मंदिर-मस्जिदवरून ठिकठिकाणी भांडणाच्या घटना घडत असून, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्यामुळे एकता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही ग्रामीण भागात हिंदू-मुस्लीम समाज आजही एकोप्याने राहत आहे. वाळूजपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूरची लोकसंख्या ३५०० हजारांच्या आसपास आहे. या गावात मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास २८००, दलित समाजाची ४००, गोसावी समाजाची ३०० एवढी असून गावात दोन शीख कुटुंबीयाचेही वास्तव्य आहे.
विशेष म्हणजे, या मुस्लीम बहुल गावात एकही हिंदू वास्तव्यास नाहीत. गावात हनुमान मंदिराची आजघडीला पूर्णपणे पडझड झाल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय सरपंच नासेर पटेल यांनी घेत मित्र-मंडळी व ग्रामस्थांची मते जाणून घेतली. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सर्वांनी सहमती दर्शविल्यानंतर सरपंच नासेर पटेल व केसापुरीचे काकासाहेब फांदाडे यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी महिन्यात जीर्णोद्धाराचे काम सुरू केले व ते आता पूर्ण झाले आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उपसरपंच मजीद पटेल, ग्रामविकास अधिकारी ए.आर. राठोड, सब्जर पटेल, अय्युब पठाण, लाल पटेल, दर्शनसिंग संधू, संजय घाडगे, दीपक खरात, हाशम पटेल आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
आज हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
नारायणपुरात जीर्णोद्धार करण्यात आलेल्या हनुमान मंदिरात उद्या बुधवार (दि.१) सकाळी १० वाजता पुजारी नंदू गुरुजी वाळूजकर यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री यांचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच नासेर पटेल, काकासाहेब फांदाडे व ग्रामस्थांनी केले आहे.