दुरुस्तीवरून कर्मचाऱ्यांसोबत वाद; संतापलेल्या तरुणाने शोरूममध्ये नवीन दुचाकी दिली पेटवून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 08:04 PM2024-11-27T20:04:48+5:302024-11-27T20:06:08+5:30
याप्रकरणी शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीमालक तरुणाविरोधात तर तरुणाने विरोधात शोरूमच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसांत तक्रार दिली आहे.
वाळूज महानगर : सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या दुचाकीसंदर्भात शोरूममधील कर्मचाऱ्यांशी वाद घालत, रागाच्या भरात स्वत:चीच दुचाकी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीमालक तरुणाविरोधात तर तरुणाने विरोधात शोरूमच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसांत तक्रार दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल दौंगे याने ४ मे २०२४ रोजी बजाजनगरातील एका शोरूमवरून दुचाकी खरेदी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुचाकीच्या मॅकवीलमध्ये बिघाड झाल्याने मॅकवील बदलून घेण्यासाठी तो मंगळवारी सायंकाळी शोरूममध्ये गेला होता. त्यावर शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी इन्शुरन्समधून मॅकवील बदलून देता येईल असे सांगितले. त्याकरिता कुणालकडे त्याचा वाहन चालवण्याचा परवाना मागण्यात आला. परंतु वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने त्याने शोरूममध्ये गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्याचदरम्यान त्याने बाहेर जाऊन आगपेटी खरेदी करून आणली. रागाच्या भरात दुचाकी खाली पाडून दुचाकीला आग लावली. अवघ्या काही क्षणात सर्व काही घडल्याने सर्व कर्मचारी व इतर ग्राहक गोंधळून गेले. दुचाकी विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुणाल ती न विझवण्यासंदर्भात दरडावून सांगत होता. त्यातच दुचाकी जळून खाक झाली.
पुढे शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी कुणाल विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर, घटनेनंतर कुणाल व त्याच्या मित्राला चौघा कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा कुणालच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला. पुढील तपास पोह किशोर घुसळे करीत आहेत.