कसलीही धाकधूक नाही, अपात्रता सुनावणीचा निकाल आमच्या बाजूनेच; संजय शिरसाटांचा विश्वास
By बापू सोळुंके | Published: January 9, 2024 02:45 PM2024-01-09T14:45:21+5:302024-01-09T14:46:35+5:30
पक्षांतर बंदी कायदाचे शेड्युल दहा आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही पक्षांतर केले नाही.
छत्रपती संभाजीनगर : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहे . या निकालाकडे संपूर्ण देशाची लक्ष लागले आहे . असे असले तरी या निकालाबाबत आमच्या मनात कोणतीही धाकधूक नाही, कारण आम्ही काही पक्षांतर केले नाही. यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा आम्हाला लागू होत नाही,यामुळे हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास शिवसेना प्रवक्ता आमदार संजय सिरसाट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला .
आमदार सिरसाट म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काय देतील याविषयी आम्हाला चिंता नाही अथवा धाकधुक नाही, कारण आम्ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. शिवाय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष खरा असल्याचे स्पष्ट केले आहे . पक्षांतर बंदी कायदाचे शेड्युल दहा आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही पक्षांतर केले नाही. यामुळे हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि या निकालानुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील असेही त्यांनी स्पष्ट केले.