शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित
By Admin | Published: March 19, 2017 11:40 PM2017-03-19T23:40:52+5:302017-03-19T23:44:55+5:30
जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तीन दिवसांत शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहरात सुमारे दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे.
महावितरणकडून मार्चअखेर वसुली पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात वीज बिल वसुली चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपासून नवीन तसेच जुन्या जालन्यात वसुली करण्यात आली. थकबाकीपोटी वीज ग्राहकांकडून २ कोटी ५१ लाखांची थकबाकीची वसुली झाली. अद्यापही दीड कोटींची थकबाकी असल्याने महावितरणकडून ही मोहीम कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महावितरणकडनू आवाहन करण्यात येऊनही ग्राहक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता तसेच कायमस्वरूपी खंडित येत आहे. आत्तापर्यंत २५७ ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने वारंवार सूचना तसेच नोटिसा बजावूनही अनेक ग्राहक थकबाकी भरण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. चार पथके असून, अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्यात वीज चोरी व गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत थकबाकी वसुलीचे प्रमाणही कमी आहे. जिल्ह्यात फक्त चार ते पाच फिडर भारनियमन मुक्त आहेत. (प्रतिनिधी)