वीस गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज केली खंडित
By Admin | Published: January 15, 2017 11:20 PM2017-01-15T23:20:35+5:302017-01-15T23:22:29+5:30
जालना/वडीगोद्री :वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे.
जालना/वडीगोद्री : महावितरण कंपनीने थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. शहर परिसरातील वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे.
वडीगोद्री परिसरात थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण राबवित आहे. याचा ‘झटका’ वीस गावांच्या पाणी योजनांनाही बसला आहे. वडीगोद्री परिसरातील वीज बिल थकीत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचेही वीज तोडण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांना भर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या थकीत बिलाचा आकडा ३० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गतवर्षीपासून वीज बील न भरणाऱ्या ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारी दिवसभर वडीगोद्री परिसरातील २० गावांचा पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. रविवारी सुटीमुळे ही मोहीम बंद ठेवली असली तरी सोमवारपासून उर्वरित गावांत मोहीम तीव्र करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत काही प्रमाणात का होईना वीज बिलांचा भरणा करीत होती. मात्र, मागील वर्षीपासून अनेक ग्रामपंचयातींनी वीज बिल भरणाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण घटले आहे. यासोबतच थकबाकीत असलेले व्यावसाईक, औद्योगिक तसेच सरकारी कार्यालये घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरूध्दही ही मोहीम सुरू केली असून, ती मार्च अखेरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)