दारुच्या बाटल्यांची प्रेतयात्रा काढून निषेध !
By Admin | Published: January 2, 2017 11:58 PM2017-01-02T23:58:10+5:302017-01-03T00:01:48+5:30
बीड : सोमवारी महिला संघटनेने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर दारूच्या बाटल्यांची प्रेतयात्रा काढून निदर्शने केली.
बीड : धारावती तांडा परिसरातील अवैध धंदे व गावठी दारू बंदीसाठी वेळोवेळी निदर्शने, आंदोलने, उपोषण करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी महिला संघटनेने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर दारूच्या बाटल्यांची प्रेतयात्रा काढून निदर्शने केली.
परळी तालुक्यातील धारावती तांडा व परिसरातील अवैध धंदे व गावठी दारूची सर्रासपणे विक्री होते. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी ठोस कार्यवाही केली नाही. दारूबंदीकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी महिला संघटनेच्या अध्यक्ष शांता राठोड, सचिव पारूबाई चव्हाण, आशा जाधव, मुरलीधर मुंडे, दीपक लोंडे, अनुसया राठोड, चांगुना आडे, वालाबाई राठोड, रवी राठोड, सचिन राठोड, नीलाबाई हनुमंते, कमल नाईकवाडे, राजेंद्र पवार, दिलीप लोंढे, संजय शिंदे, शिवकन्या लोंढे आदी महिलांनी मोर्चा काढला. यात दारूच्या बाटल्यांची प्रेतयात्रा काढण्यात आली.
अवैध धंदे व गावठी दारू विक्री बंद न झाल्यास प्रजासत्ताक दिनी हिंसक आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)