कमी जागांमुळे उडाला असंतोषाचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:19 AM2018-02-13T00:19:10+5:302018-02-13T11:52:51+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ६९ जागांसाठी साडेतीन लाख अर्ज, पोलीस भरतीतही अवघ्या चार हजार जागा आणि ‘एमपीएससी’ने जाहीर केलेल्या अहवालात चालू वर्षात एकाही पदाची जाहिरात निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. लाखो बेरोजगारांकडून अर्जांच्या नावाखाली कोट्यवधी रूपये वसूल करण्यात येतात. त्या तुलनेत तुटपुंज्या जागा काढण्यात येत असल्याची खदखद राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांमध्ये आहे. हीच खदखद ठिकठिकाणी निघणाºया मोर्चातून बाहेर पडत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ६९ जागांसाठी साडेतीन लाख अर्ज, पोलीस भरतीतही अवघ्या चार हजार जागा आणि ‘एमपीएससी’ने जाहीर केलेल्या अहवालात चालू वर्षात एकाही पदाची जाहिरात निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. लाखो बेरोजगारांकडून अर्जांच्या नावाखाली कोट्यवधी रूपये वसूल करण्यात येतात. त्या तुलनेत तुटपुंज्या जागा काढण्यात येत असल्याची खदखद राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांमध्ये आहे. हीच खदखद ठिकठिकाणी निघणाºया मोर्चातून बाहेर पडत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.
औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांनी ६ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तालयावर विराट मोर्चा काढला. या मोर्चानंतर बीड, नांदेड, नागपूर, यवतमाळ, पुणे, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांतील युवकांची मागणी ही परीक्षांच्या वेळापत्रकांचे काटेकोर पालन, त्यात सुसूत्रता, पारदर्शकता, पदांची निश्चित संख्या अशा गुणात्मक बदल या आहेत.
याशिवाय तलाठी, पोलीस, शिक्षक, लिपिक सारख्या पदांची भरती जिल्हास्तरावरील अधिकाºयांमार्फत न करता त्यासाठी राज्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी, अशीही मागणी आहे. या मागण्या अनेक वर्षांपासून आहेत. २९ डिसेंबर रोजी राज्य सेवा भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यात केवळ ६९ जागा भरणार असल्याचे स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करीत वाट पाहणाºया युवकांचा हिरमोड झाला. या ६९ जागांपैकी केवळ १७ जागा खुल्या आहेत. उर्वरित सर्व जागा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. या जागांसाठी तब्बल साडेतीन लाख जणांनी अर्ज केले आहेत. १५ दिवसांपासून पोलीस भरतीसंदर्भातही जाहिराती देण्यात येत आहेत. यातही अत्यल्प जागा आहेत.
दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कार्यकाळात प्रत्येक भरतीवेळी १० हजारांपेक्षा अधिक जागा निघत. मात्र, मागील तीन वर्षांत पहिल्यांदाच होत असलेल्या पोलीस भरतीत आवघ्या ४ हजारांच्या जवळपास जागा भरल्या जाणार आहेत.
तयारी करणाºया युवकांच्या तुलनेत हा आकडा अत्यल्प आहे. याचवेळी एमपीएससीतर्फे १ फेब्रुवारी रोजी जागा भरतीच्या सद्य:स्थितीचा अहवाल जाहीर करण्यात आला. यात २०१८ या वर्षात एकही परीक्षा नियोजित नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पाच ते दहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांच्या असंतोषाचा भडका उडाला, असे परीक्षा तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुंबईतही निघणार मोर्चा
औरंगाबादेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांनी राज्यातील पहिला मोर्चा काढला. यानंतर राज्यातील विविध शहारांमध्ये मोर्चे काढण्यात आले.
या मोर्चांची राज्य सरकारने दखल न घेतल्यास लवकरच मुंबईतही विराट मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पहिल्या मोर्चाचे संयोजक बाळासाहेब सानप यांनी दिली.
उद्याच्या अंकात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियोजन आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला ‘तामिळनाडू पॅटर्न’.