पाणीपुरवठा योजनांच्या कामांवरून प्रशासनावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:04 AM2021-05-24T04:04:21+5:302021-05-24T04:04:21+5:30
औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आला. उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागात पोहोचत असताना सदस्यांनी सुचविलेली एकही विंधन विहीर झाली ...
औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आला. उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागात पोहोचत असताना सदस्यांनी सुचविलेली एकही विंधन विहीर झाली नाही. तात्पुरत्या पाणीपुरवठ्याच्या चार योजना सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात टंचाईची अत्यावश्यक कामे तांत्रिक अडसर दाखवून होत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाबद्दल सदस्यांत नाराजीचा सूर आहे.
टंचाईच्या सर्वेक्षणात कनिष्ठ भूवैज्ञानिक नसल्याचे कारण समोर करून पाणीपुरवठा विभाग वेळ मारून नेत आहे. जलव्यवस्थापन समितीत सूचना करूनही कामे होत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती पावले उचलून टंचाईग्रस्त गावांत पाण्याची सुविधा निर्माण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी समाजमाध्यमातून केली. त्यावर टंचाईची परिस्थिती मान्य आहे. मात्र, दोन्ही बाजूने विचार व्हावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी मत व्यक्त केले.
याविषयी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे म्हणाले, वैजापूर ३, गंगापूर १, सिल्लोड १ अशा गावांत कनिष्ठ भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण करून टंचाईचे प्रपत्र ब भरून दिले. रमेश पवार यांनी सूचना केलेला औरंगाबाद तालुक्यातील गावांचा सर्वेक्षण अहवाल सोमवारी सादर होईल. त्यांनी पूर्वी सुचविलेल्या विंधन विहिरीसंदर्भात १५ दिवसांसाठी मिळालेल्या भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण करून फिजिबिलिटी नसल्याचे सांगितल्याने ती कामे होऊ शकली नाहीत. त्याचे पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार, सर्वेक्षण सुरू आहे. जिल्ह्यात पैठणमध्ये हर्षा, नांदर, गंगापूर आणि सिल्लोडमध्ये तात्पुरत्या पाणीपुरवठा नळयोजनांची कमी खर्चाची कामे प्रस्तावित आहे. ती प्रगतीपथावर आहेत.
---
तीन भूवैज्ञानिक दोन दिवसांत मिळतील
कंत्राटी स्वरूपात तीन भूवैज्ञानिकांची निवड यादी तयार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर त्यांना नियुक्ती देण्यात येईल. मागणी असलेल्या टंचाई क्षेत्रात ते सर्वेक्षण करून प्रपत्र ब भरतील. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने टाचाईचे कामे सुरू होतील. जलजीवन मिशनच्या कामांनाही चालना मिळेल. त्यामुळे पुढील आठवड्याभरात तांत्रिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता अशोक घुगे यांनी व्यक्त केली.