‘डासमुक्तीचा पॅटर्न टेंभूर्णीचा, नांदेड जिल्हा परिषदेचा नव्हे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 12:08 AM2016-03-17T00:08:32+5:302016-03-17T00:11:58+5:30
नांदेड : डासमुक्तीचा पॅटर्न देशातच नव्हे, तर जगभरात गाजत असताना या पॅटर्नच्या हक्काबाबत वाद निर्माण झाला आहे़
नांदेड : डासमुक्तीचा पॅटर्न देशातच नव्हे, तर जगभरात गाजत असताना या पॅटर्नच्या हक्काबाबत वाद निर्माण झाला आहे़ हिमायतनगर तालुक्यातील टेंभूर्णी येथील ग्रामस्थांनी डासमुक्तीचा पॅटर्न आमचा असून जिल्हा परिषद नांदेड याचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला आहे़ यापुढे डासमुक्तीचा टेंभूर्णी पॅटर्न असा उल्लेख करण्याची मागणी करीत बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले़
हिमायतनगर तालुक्यातील टेंभूर्णी येथे सर्वप्रथम डासमुक्तीची सुरूवात २००४-०५ मध्ये करण्यात आली़ आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शोषखड्डे तयार करून गाव गटारमुक्त करण्यात आले़ त्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होवून गाव डासमुक्त झाले़ याबाबतची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती हिमायतनगर यांच्याकडे होती़ त्यांच्या सांगण्यावरून जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी टेंभूर्णी गावास नोव्हेंबर ते डिसेंबर २०१४ या कालावधीत वारंवार भेटी देवून गावकऱ्यांशी संवाद साधला़
त्यांनी श्रमदान व लोक- सहभागातून केलेल्या कामाची पाहणी केली़ या बाबीचा अभ्यास करून व केलेल्या कामाची उपयोगिता लक्षात आल्यानंतर ११ जानेवारी २०१५ रोजी टेंभूर्णी येथे जि़ प़ चे सर्व विभाग प्रमुख व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन केलेल्या कामाची माहिती दिली़ हे डासमुक्तीचे व गटारमुक्तीचे काम टेंभूर्णी पॅटर्न या नावाने जिल्हाभर राबविण्याची घोषणा केली़
त्यानंतर दिल्ली येथील स्वच्छता विभागाच्या बैठकीत ग्रामविकास मंत्रालयाकडे या कार्याचे सादरीकरण करण्यात आले़ या कामास नारेगा आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडून २ हजार रूपये अनुदान मंजूर करून हे काम पूर्ण नांदेड जिल्ह्यात सुरू केले़ मात्र जेव्हा ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव व्ही़ गिरिराज नांदेड दौऱ्यावर आले असताना श्रमदान व लोकसहभागातून टेंभूर्णी गावाने केलेले काम न दाखवता २ हजार रूपये अनुदान देवून ज्या गावात काम केले तेच गाव दाखविण्यात आले़
शासनदरबारी डासमुक्तीचा पॅटर्न म्हणून २१ डिसेंबर २०१५ रोजी शासन निर्णय झाला व आता हा डासमुक्तीचा नांदेड पॅटर्न म्हणून सातासमुद्रापार गेला़ त्यामुळे टेंभूर्णी येथील सरपंच, शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, गोरगरीब जनतेवर अन्याय झाला असल्याचे सरपंच प्रल्हाद भाऊराव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे़ दरम्यान, बुधवारी टेंभर्णूी येथील नागरिकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले़ (प्रतिनिधी)