जि. प. शाळेतील वृक्ष लागले वाढीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:04 AM2021-04-21T04:04:37+5:302021-04-21T04:04:37+5:30
लाडसावंगी : जिल्हा परिषद शाळेत हरित शाळा अभियान अंतर्गत ऑगस्ट २०२० मध्ये वृक्षलागवड करण्यात आली होती. या वृक्षाची काळजी ...
लाडसावंगी : जिल्हा परिषद शाळेत हरित शाळा अभियान अंतर्गत ऑगस्ट २०२० मध्ये वृक्षलागवड करण्यात आली होती. या वृक्षाची काळजी घेतल्याने ही झाडे आठ महिन्यानंतर चांगलीच वाढीस लागली आहेत. लॉकडाऊनच्या काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे यश आहे.
मियावाकी घनवन पद्धती ही आधुनिक वृक्षारोपण पद्धत आहे. जपानचे पर्यावरण शास्त्रज्ञ अकीरा मियावाकी यांनी ही पद्धत विकसित केलेली आहे. या वृक्षारोपण पद्धतीने कमी जागेत जास्त वृक्ष लागवड केली जाते. हे घनवन तीस टक्के ऑक्सिजन वाढविते. जिल्हा परिषद औरंगाबाद व लाडसावंगी जि.प. शाळेच्या संयुक्त विद्यमाने ४० बाय ५० चौरस मीटर जागेत सातशे वृक्षांची लागवड करण्यात आली. तीन फूट खड्डे खोदून शेणखत, कोकोपेट, काळी माती आदीचे मिश्रण टाकून ही जास्त ऑक्सिजन देणारी झाडे लागवड केली आहेत.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शाळेचे शिपाई संजय पाटील व स्थानिक शिक्षक ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी झाडाची देखभाल व अंतर्गत मशागत करून या झाडाला सतत तिसऱ्या दिवशी पाणी दिले. आठ महिन्याच्या अथक परिश्रमाने शाळेतील वृक्ष वाढीस लागले असून, शाळेतील परिसराला वैभव प्राप्त झाले आहे. काही वृक्षांची उंची ही आठ ते दहा फुटापर्यंत गेली आहे. त्यामुळे येत्या काळात शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना छोटेखानी बगीचा खुला होणार आहे.
फोटो कॅप्शन : लाडसावंगी जिल्हा परिषद शाळेत वृक्षाला पाणी भरताना शिपाई संजय पाटील.
200421\img_20210420_091430_1.jpg
मियावाकी पद्धतीने लावण्यात आलेल्या वृक्षाना पाणी देताना शिक्षक