जगभरातील धर्मांवर आधारित हिंसेमुळे व्यथित - दलाई लामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 06:43 AM2019-11-24T06:43:14+5:302019-11-24T06:43:47+5:30
मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा.
औरंगाबाद : मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा. या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत. परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडविली जात आहे, याचे मला दु:ख होते, असे जागतिक धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.
जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांचे शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथे आगमन झाल्यानंतर शनिवारी सकाळी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भारताच्या २६०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन विचारात दिलेल्या शिकवणीनुसार अहिंसा आणि करुणा याला महत्त्व दिल्यामुळे मानव मानवातील द्वेषाला इथे थारा नाही. परंतु सध्या जगभरात धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसा घडविली जात आहे. याबाबतची दृश्ये टीव्हीवर पाहताना मला अतिव दु:ख होते, असे सांगून दलाई लामा म्हणाले की, धर्माच्या नावाखाली प्रामुख्याने ख्रिश्चन, इस्लाम यांना त्रास दिला जातो. माझ्या दृष्टीने व्यथित करणारी बाब म्हणजे बर्मामध्ये बौद्धांकडून मुस्लिमांना तर इस्रायलमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनांना तर इजिप्तमध्ये शिया-सुन्नीवरून धार्मिक हिंसा घडविली जात आहे. मोहम्मद पैगंबरांनी सहाशे वर्षांपूर्वी करुणा आणि शांततेची शिकवण दिली. आजही तेच मोहम्मद आहेत. त्यांची तीच करुणा आहे आणि तीच पाच वेळा केली जाणारी प्रार्थना आहे. तरीही ही हिंसा का, याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी ज्या-ज्या देशांत जातो तेथे करुणा आणि अहिंसेचे महत्त्व सांगत असतो.
कारण कोणताही धर्म माणसाला मारण्याची परवानगी देत नाही. या पार्श्वभूमीवर
भारतातील २६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची आठवण होते. या संस्कृतीचा प्रचार करण्याची गरज आहे. मी स्वत:ला भारतीय मानतो. कारण मी गेल्या साठ वर्षांपासून या देशात राहतो.
मला एका फ्रेंच पत्रकाराने विचारले असता मी त्यांना सांगितले होते, माझे मस्तिष्क भारतातील नालंदा विश्वविद्यालयाच्या तत्त्वज्ञानाने भरलेले आहे, तर माझे भरण-पोषण या देशातील डाळ, चपातीने केले आहे. मी भारताचा पुत्र आहे (आय अॅम सन आॅफ इंडिया), असेही दलाई लामा म्हणाले.
केवळ प्रार्थनेतून माणूस घडणार नाही
आधुनिक शिक्षणातून भौतिकवादी माणूस घडवला जातो आहे. त्यांच्यामध्ये करुणा आणि अहिंसेचा अभाव दिसून येतो. भारतीय समाजाचेही तसेच झाले आहे. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा आणि अहिंसा मानवतावाद यावरील भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानातील शिक्षण देण्याची गरज आहे. केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणूस घडणार नाही. माणसाला धर्मातील मानवी कल्याणाची मूल्ये अंगीकारावी लागतील. केवळ ‘बुद्धम शरणम् गच्छामि’ म्हणून हे मूल्य प्रत्यक्षात येणार नाही.
- दलाई लामा