सिडको वाळूज महानगरात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:11 PM2019-03-19T23:11:31+5:302019-03-19T23:11:47+5:30
मागील आठवडाभरापासून सिडको वाळूज महानगरातील अनेक नागरी वसाहतींत नागरिकांच्या नळाला माती मिश्रीत पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत आहे.
वाळूज महानगर : मागील आठवडाभरापासून सिडको वाळूज महानगरातील अनेक नागरी वसाहतींत नागरिकांच्या नळाला माती मिश्रीत पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत आहे. दूषित पाण्यमुळे साथीच्या आजाराची लागण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.
सिडको प्रशासन एमआयडीसीकडून पाणी विकत घेवून महानगरातील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करते. परंतू सिडकोच्या पाणीपुरवठा करणाऱ्या अंतर्गत जलवाहिनीला व वॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. हेच घाण पाणी पुन्हा जलवाहिनीत मिसळत आहे. त्यामुळे सिडकोतील स्वामी विवेकांनदनगर, स्वामी समर्थ हौ. सोसायटी, साई सहवास हौ. सोसायटी, साक्षीनगर, देवगिरीनगर, साईनगर, जिजामाता नगर आदी भागातील नागरिकांच्या नळाला माती मिश्रीत गढूळ पिवळसर रंगाचे पाणी येत आहे. मागील आठवडाभरापासून हा प्रकार सुरु असून, मंगळवारी पुन्हा नळाला दूषित पाणी आले.
दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांना गॅस्ट्रो, कावीळ, पोटदुखी, जुलाब व त्वचेचे साथीचे आजार जडत आहेत. साथीच्या आजाराने लहान मुले आजारी पडत आहेत. प्रशासनाने जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम करुन शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
या विषयी सिडकोचे अभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, एमआयडीसीकडूनच दूषित पाणी येत आहे. सिडकोकडे स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र नाही. तरीही येणाऱ्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा केला जात आहे.