१६ लाख एलईडी बल्बचे वाटप...!
By Admin | Published: July 14, 2015 12:29 AM2015-07-14T00:29:38+5:302015-07-14T00:29:38+5:30
अशोक कारके , औरंगाबाद विजेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वीज बचतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
अशोक कारके , औरंगाबाद
विजेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वीज बचतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता महावितरणच्या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येत आहेत. औरंगाबाद परिमंडळामध्ये १५ लाख ८१ हजार एलईडी बल्ब वितरित करण्यात येणार आहेत, असे परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी सांगितले.
शहरात २ लाख ३२ हजार तर औरंगाबाद ग्रामीणमध्ये २ लाख ६६ हजार व जालना जिल्ह्यात १ लाख ५८ हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. या साडेसहा लाख वीज ग्राहकांना महावितरणकडून जवळपास १६ लाख एलईडी बल्ब सवलतीमध्ये देणार आहेत. परिमंडळातील शंभर टक्के घरगुती ग्राहकांनी एलईडी दिवे वापरल्यास जवळपास ७० टक्के विजेची बचत होईल. त्यामुळे घरगुती वीजबिल कमी होईल. त्याचा फायदा ग्राहक आणि कंपनीला होईल. राज्यात कंपनीचे १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांनी एलईडी वापरल्यास दरवर्षी १ हजार ३०० मेगावॅट युनिट विजेची बचत होणार आहे. एक घरगुती ग्राहकाला ७ वॅट क्षमतेचे दोन ते चार बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. तीन वर्षापर्यंत बल्बची गॅरंटी देण्यात येईल.
पूर्वी अॅल्युमिनियमच्या तारा असलेले बल्ब वापरले जात होते. यात अधिक वीज खर्च होत होती. आता बहुतांशी नागरिक सीएफएल बल्ब वापरत आहेत. या बल्बमुळेही विजेची बचत होते. पण त्यापेक्षा अधिक बचत एलईडी बल्ब वापरल्याने होते. कारण त्यामध्ये सिलीकॉन धातूने बनविलेली डायड सिस्टिम वापरली जाते.
वीज बचतीचे गणित
४० व्हॅटच्या एका बल्बचा वापर होत असेल तर २५ तासांना १ युनिट रीडिंग पडते. एक एलईडी बल्ब वापरल्यास १२५ तासांना एक युनिट रीडिंग पडते. एलईडी बल्ब वापरल्यास जवळपास ८० टक्के विजेची बचत होईल, असे गणित आहे.