औरंगाबादेत सात महिन्यांत ३.३३ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:00 PM2020-08-24T14:00:05+5:302020-08-24T14:03:05+5:30

ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.

Distribution of 3.33 lakh Shivabhojan plates in Aurangabad in seven months | औरंगाबादेत सात महिन्यांत ३.३३ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

औरंगाबादेत सात महिन्यांत ३.३३ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देदररोज १८ केंद्रांवर ३ हजार थाळ्या वाटप लाभधारकांनी पोळी, भाजी वाढविण्याची केली मागणी 

औरंगाबाद : जानेवारी महिन्यात सुरू झालेली शिवभोजन योजना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आधार ठरली. शहरात चारच केंद्रांत सुरू झालेली ही योजना आता जिल्ह्यात १८ ठिकाणांहून पाच रुपयांत शिवभोजन थाळी  देत आहे. जुलैअखेर ३ लाख ३२ हजार ३१३ थाळ्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रांना ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वाटप झाले नाही तर मोफत वाटप करून कोटा पूर्ण केला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले. लाभधारकांनी जेवण चांगले मिळत असल्याचे प्रशस्तीपत्र देतानाच भाजीपोळी वाढवण्याची गरज व्यक्त केली.

लोकमत प्रतिनिधीने  बसस्थानक, टीव्ही सेंटर, घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यात एकूण १८ केंद्र आहेत. त्यापैकी सहा केंद्र शहरात असून १२ केंद्र ग्रामीण भागात आहेत. त्यांना एकूण ३ हजार थाळ्या वाटपाची परवानगी मिळालेली आहे. कोरोनामुळे थाळीऐवजी पॅकिंग फूड दिले जाते. थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व भात देण्यात येत असल्याचे घाटीतील केंद्रचालक राजू भैरव यांनी सांगितले. तर लॉकडाऊन काळातही ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वितरण रोज पूर्ण केल्याचे बसस्थानक येथील केंद्रचालक उपिंदर मल्होत्रा म्हणाले.

१७ केंद्रांतून २३४५ पाकिटांचे वाटप
या योजनेतून थाळीचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅपद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याची आकडेवारी थेट अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वितरण प्रणालीवर कळते. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत २३४५ थाळ्यांचे वाटप झालेले होते, तर १८ पैकी शहरातील शिवाजीनगर येथील केंद्रावर एकही थाळी वाटप करण्यात आलेली नव्हती. केंद्रचालकांना मंजूर थाळ्यांचे अन्न पाकीट तयार होते. ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.

 

शिवभोजन थाळ्यांच्या वाटपाची आकडेवारी

महिना :     थाळ्यांचे वाटप
जानेवारी :     २,७९०
फेब्रुवारी :     १४,६२९
मार्च :     १९,८९३
एप्रिल :     ६७,०१७
मे :     ७०,९८८
जून :     ७८,४९४
जुलै :     ७८,५०२
एकूण :     ३,३२,३१३ 


नातेवाईक नव्हते तरी अडचण आली नाही
गेल्या आठ दिवसांपासून घाटीत पत्नी भरती आहे. इथे कोणी नातेवाईक नाही; परंतु शिवभोजनामुळे इथे जेवणाची अडचण आली नाही. वरण-भातासोबत रोज वेगळी भाजी असते.
- गंगाधर दुतोंडे, भोकरदन

पैसे नसले तरी मोफत भोजन
मला कोणीच नसल्याने मी दोन महिन्यांपासून घाटीच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यात राहते. माझ्याकडे पैसे नाहीत; परंतु मोफत शिवभोजन मिळते. चांगले व पोटभर जेवण होते. 
-शेख नसीम, बीड

भाजी व पोळी वाढविली पाहिजे
बसस्थानकाजवळ एका इमारतीवर काम करतो. दुपारचे जेवण मी बसस्थानकातील शिवभोजन केंद्रावरून पाकीट घेऊन करतो. पोळी आणि भाजी वाढवून दिली पाहिजे; पण किंमत वाढवू नये.
- सुरेश जाधव, सिडको
 

Web Title: Distribution of 3.33 lakh Shivabhojan plates in Aurangabad in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.