परिवहन अधिकारी नखाते यांच्याकडून चाचणीविना ४ हजार परवान्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 07:13 PM2020-01-28T19:13:23+5:302020-01-28T19:18:27+5:30
एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४ हजार परवान्यांचा हा घोटाळा आहे.
औरंगाबाद : चोरीच्या ट्रकच्या पुनर्नोंदणीप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांची इतर प्रकरणेही आता समोर येऊ लागली आहेत. तब्बल ४ हजार पक्के वाहन चालविण्याचे परवाने चाचणीविना, सुटीच्या दिवशी वाटप केल्याप्रकरणीही चौकशी सुरू असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.
एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४ हजार परवान्यांचा हा घोटाळा आहे. नागपूर आरटीओ कार्यालयात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत लर्निंग लायसन्सचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अधिकारी-एजंटासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात सहायक मोटार वाहन निरीक्षकांना अटकही झाली होती. औरंगाबादेतील परवाना घोटाळाही अशाच पद्धतीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील अनेक परवाने चाचणीविना वाटप झालेले आहेत, तर अनेक परवाने कार्यालय बंद असल्याच्या दिवशी म्हणजे सुटीच्या दिवशी मंजूर झालेले आहेत. या सगळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये श्रीकृष्ण नकाते यांचे प्रमुख नाव आहे. विनाचाचणी आणि सुटीच्या दिवशी पक्के लायसन्स देण्याच्या प्रकाराविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकारणाची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
१०० पानी अहवाल
आरटीओ कार्यालयाने यासंदर्भात १०० पेक्षा अधिक पानांचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये वितरित झालेल्या परवान्यांची माहिती नमूद केलेली आहे. औद्योगिक कंपन्यांत मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोडरचे (वाहन) लायसन्स दिले गेले आहे. प्रत्यक्षात चाचणीसाठी असे वाहन आलेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाला सविस्तर अहवाल पाठविण्यात आला आहे.