बंदिजनांना भगवद्गीता ग्रंथाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:04 AM2021-01-08T04:04:56+5:302021-01-08T04:04:56+5:30
पश्चात्तापाच्या खऱ्या अश्रूंनी पाप धुतले जाते, असे म्हणतात, तर अशा पश्चात्ताप झालेल्या व्यक्तींना जीवनमूल्याचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी मिळावी, ...
पश्चात्तापाच्या खऱ्या अश्रूंनी पाप धुतले जाते, असे म्हणतात, तर अशा पश्चात्ताप झालेल्या व्यक्तींना जीवनमूल्याचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी मिळावी, आत्मपरीक्षण करता यावे या उद्देशाने इस्कॉनच्या हरे कृष्ण भक्तांनी हा उपक्रम घेतला.
इस्कॉन औरंगाबादच्या सिडको शाखेच्या वतीने गीता जयंतीच्या निमित्ताने २५ डिसेंबरला गीता तुलाचे आयोजन करण्यात आले. तुलेमार्फत अनेक भक्तांनी आपल्या वजनाइतक्या गीता दान दिल्या. या दान देण्यात आलेल्या भगवद्गीता हर्सूल कारागृह येथील बंदिजनांना वितरित करण्यात आल्या.
नववर्षाचे औचित्य साधून इस्कॉनच्या भक्तांनी कारागृहात जाऊन केलेल्या ‘हरे कृष्ण’ कीर्तनाने नवचैतन्य निर्माण झाले.
या कार्यक्रमासाठी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक बी.डी. श्रीराव, तुरुंगाधिकारी चंद्रकिरण तायडे, मेघा कदम, कैलास काळे, शिक्षिका पंचशीला चव्हाण, सुभाष गिते तसेच इस्कॉनच्या वतीने रुक्मिणी रमण प्रभू, श्रीधर प्रिय प्रभू, सत्यभामा प्राण प्रभू, गिरिधारी गोविंद प्रभू, मनीषा चाटे, समीर गाढेकर यांची उपस्थिती होती.