पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

By विजय सरवदे | Published: March 14, 2024 03:48 PM2024-03-14T15:48:25+5:302024-03-14T15:48:46+5:30

आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

Distribution of orphan certificates to only five children in a fortnight | पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील अवघ्या ५ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अनाथ प्रमाणपत्रासाठी प्राप्त प्रस्तावानुसार बालकल्याण समिती तसेच बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतरच ही प्रमाणपत्रे देण्यात आली. 

तथापि, अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे वितरित करण्याचे काम निरंतरपणे सुरू असून आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ अनाथ तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदानाचा लाभ मिळत नाही. परिणामी, प्रमाणपत्राअभावी त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने बालगृहात दाखल अथवा नातेवाईक सांभाळ करीत असलेल्या व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. यासाठी महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी या विभागाच्या जिल्हा कार्यालयात समर्पित कक्षही स्थापन केला होता.

या मोहिमेद्वारे बालकांना केवळ अनाथ प्रमाणपत्रच नव्हे, तर आधार कार्ड, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड अशी अनेक प्रमाणपत्र देण्याचे नियोजन होते. या मोहिमेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली. सध्या ५ बालकांना दाखले देण्यात आले असले, तरी अनेक बालकांचे विविध दाखल्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे निर्णयास्तव प्रलंबित आहेत.

संस्थाबाह्य प्रस्ताव निकाली
यासंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले की, या पंधरवड्यात संस्थाबाह्य आलेल्या प्रस्तावातील ५ बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घरभेटी देऊन सत्यता पडताळल्यानंतरच अनाथ प्रमाणपत्रे दिली जातात. जिल्ह्यात निरंतरपणे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू असते. आतापर्यंत जिल्ह्यातील १७० अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

Web Title: Distribution of orphan certificates to only five children in a fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.