जंतनाशकाच्या गोळ्यांचे वाटप झाले केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थी राहिले वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 02:20 PM2017-08-24T14:20:38+5:302017-08-24T14:22:06+5:30
राज्य कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत सध्या शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. परंतु , हे वितरण केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनांच होत असून विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना या मोहिमेतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार लासूर स्टेशन येथे उघडकीस आला आहे.
लासूर-स्टेशन ( औरंगाबाद ),दि.२४ : राज्य कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत सध्या शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. परंतु , हे वितरण केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनांच होत असून विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना या मोहिमेतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार लासूर स्टेशन येथे उघडकीस आला आहे. या प्रकाराने विना अनुदानित शाळेतील जवळपास ७ शाळेतील ३२०० विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या पासून वंचित राहावे लागले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य कुटुंब कल्याण कार्यालया तर्फे १८ ते २१ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमे अंतर्गत १ ते १९ वयोगटातील शासकीय, अनुदानित, अंगणवाडी एवढेच नव्हे तर शाळा बाह्य मुला मुलींनाही जंतनाशकाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, आश्चर्यकारकरित्या केवळ विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच या मोहिमेतून गोळ्याचे वितरण करण्यात आले नाही. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून वर्षातून एकदा प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी केली जाते. यात काही दुजाभाव नाही मग जंतनाशक मोहिमेतूनच विना अनुदानित शाळा का वगळण्यात आल्या ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
दोन अधिका-यांचे विसंगत उत्तरे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, मान्यता प्राप्त सर्वच शाळेतील पाञ विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येतात. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश घोडके यांनी सांगितले की, मार्गदर्शक सुचने नुसार आरोग्य विभागाच्या वतीने शासकीय, निमशासकीय, अंगणवाडी व शाळा बाह्य मुला मुलींनाच जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येतात.
केवळ शासकीय व अनुदानित शाळांमध्ये वाटप
शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. विना अनुदानित व स्वंय साहित शाळेतील विद्यार्थ्यांना मोहिमेतून वगळले आहे.
-प्रभाकर पवार , केंद्र प्रमुख
वंचितांना वाटप व्हावे
वयोगट प्रमाण मानून सर्वच विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेत समाविष्ट करण्याची गरज होती. वंचित विद्यार्थ्यांनाही जंतनाशकाच्या गोळ्या वाटप करण्यात याव्यात.
सुगंधा परेरा, मुख्याध्यपिका,सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल
मुलांना वंचित ठेवणे चुकीचे आहे
जंतनाशकाच्या गोळ्या घेण्यासाठी पात्रता हि १ ते १९ वयोगटातील मुले व मुलीं अशी आहे. यामुळे केवळ विना अनुदानित शाळेतील विद्यार्थी आहे, म्हणून काही जणांना वंचित ठेवणे हे चुकीचे आहे. सर्वच पाञ मुलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जंतनाशकाच्या गोळ्या मिळवून देण्यासोबतच चुकीच्या असलेल्या मार्गदर्शक सूचना बदलण्यासाठी प्रयत्न करणार.
- प्रशांत बनसोड, शिवसेना