औरंगाबाद शहरभर पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:23 AM2018-05-25T00:23:42+5:302018-05-25T00:26:24+5:30

महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो.

Distribution of water to Aurangabad city | औरंगाबाद शहरभर पाण्यासाठी वणवण

औरंगाबाद शहरभर पाण्यासाठी वणवण

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा रोज उपसते १५९ एमएलडी पाणी : एवढे पाणी जायकवाडीतून घेऊनही ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत २० टक्के पाणी गळती होते. १३९ एमएलडी पाणी पालिका शहरात रोज कुठे-कु ठे वितरित करते, असा प्रश्न आहे. सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मग तीन दिवसांतील ४२० एमएलडी पाणी पालिका कुणाला पुरविते याची कुठलीही माहिती पाणीपुरवठा विभागाकडे नाही.
दरम्यान, जुन्या शहरासह सिडको, हडको, पडेगाव, सातारा देवळाई परिसर, जटवाडा रोड, अशा सर्वच ठिकाणी नागरिकांची पाण्यासाठी वणवण दिसते.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चार दिशांमध्ये शहरी लोकसंख्येची विभागणी केली, तर ४ लाख लोकसंख्या प्रत्येक दिशेमध्येचे प्र्रमाण येते. मग ४ लाख लोकांना रोज १४ कोटी लिटर पालिका पुरवीत असेल, तर दरडोई ३५० लिटर पाणी मिळण्याचे प्रमाण येते; परंतु एकाही दिशेत राहणाऱ्या नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी मिळत नाही. चारही दिशांमधून पाण्यासाठी ओरड सुरू आहे. कारण शहरात गळतीवर मात करून येणाºया १३९ एमएलडी पाणी जर प्रत्येक मतदारसंघनिहाय तीन दिवसाआड दिले, तर पाण्याची ओरडच होणार नाही; परंतु कुठेही ३५० लिटर दरडोई पाणी शहरात मिळत नाही. १३५ लिटर, २७० लिटर आणि ३५० लिटर, असे तीन प्रकार दरडोई पाणीपुरवठा करण्यासाठी आहेत. यातील एकही मानक पालिका सध्या पूर्ण करू शकत नाही.
अनेक भागांत अर्धा तास पाणी
पुंडलिकनगर जलकुंभावरील वसाहतींना गुरुवारी अर्धा तास पाणीपुरवठा करण्यात आला. भावसिंगपुरा परिसरात पाणीपुरवठाच झाला नाही. एकाच दिवशी दोन टोकांच्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याचे हे कसले नियोजन आहे. हे विचारण्यासाठी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. पालिका रोजी १३९ एमएलडी पाणी शहरात आणत आहे. मग ते शहरातील कोणत्या भागात वितरित केले जाते, त्याचे वेळापत्रक कसे आहे, प्रभागनिहाय पाणीपुरवठा सुरू आहे काय? याची कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. रोज एवढे पाणी येत असेल, तर जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरून वितरण होणे शक्य आहे. काही वॉर्डांना २४ तास पाणी सुरू असते, तर काही वॉर्डांत पाच दिवस उलटूनही पाणी येत नाही, अशी परिस्थिती आहे.
सातारा देवळाईत हातपंप, विहिरीने तळ गाठला
सातारा-देवळाईत दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीपातळी घटते. परिसरातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला असून, हातपंप, बोअरवेलला थेंबभरही पाणी येत नाही. त्यामुळे महिला व लहान मुलांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी ग्रामपंचायत काळात जिल्हा प्रशासन मोफत टँकरने पाणीपुरवठा करीत होते.
मनपात परिसर समाविष्ट झाला आणि पाण्यासाठी नागरिकांना आता बारा महिने पैसे मोजावे लागत आहेत. हातपंपावर नागरिकांची जेमतेम तहान भागत होती; परंतु उन्हाचा पारा वाढला. भूगर्भातील पाणी आटले असून, विहीर व बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्यासाठी नागरिकांना परिसरात भटकंती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
पाणीपुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठल्याने दोन महिन्यांपासून विहिरीचे जलवाहिनीद्वारे येणारे पाणी खंडित झाले आहे. पाणी मिळावे म्हणून स्थानिक नागरिकांनी तीव्र निदर्शनेदेखील केली. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था सध्या कोसोदूर दिसतेय. शाळेतील मुलेदेखील उन्हाळ्यात पायपीट करीत पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत.
घाटीत पाणीटंचाई; रुग्णसेवेवर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून घाटी रुग्णालयाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून अपुरा आणि वेळी अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी अनेक विभागांसाठी टँकर मागविण्याची नामुष्की ओढावत आहे.
घाटीत एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २००० ते २५०० रुग्ण येतात. दररोज छोट्या-मोठ्या ५० ते ७० शस्त्रक्रिया होतात. अपघात विभागात २०० ते ३०० रुग्ण दाखल होतात, तर दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. स्वच्छतेसह रुग्णसेवेसाठी सर्वच वॉर्ड, अतिदक्षता कक्ष तसेच शस्त्रक्रियागृहात मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. (पान २ वर)

Web Title: Distribution of water to Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.