औरंगाबादेत होणार जिल्हा आयुष रुग्णालय, आयुष औषधी अरण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 04:32 PM2021-11-19T16:32:33+5:302021-11-19T16:35:06+5:30
AYUSH Hospital In Aurangabad: सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पहाडसिंगपुरा परिसरातील ५ ते १२ एकर जागेची पाहणी
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमांतर्गत औरंगाबादेत जिल्हा आयुष रुग्णालय उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी ५ ते १२ एकर जागेचा शोध सुरू आहे. रुग्णालयाच्या जागेतच आयुष औषधी अरण्यही साकारण्यात येणार (AYUSH Hospital In Aurangabad ) आहे. यादृष्टीने पहाडसिंगपुरा परिसरातील जागेची सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात आली.
केंद्र शासनाने आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी या प्राचीन चिकित्सा पद्धतींना चालणा देण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना केली. या मंत्रालयामार्फत देशभर आयुष रुग्णालये उभारण्यात येत आहेत. औरंगाबादेत ३० खाटांचे जिल्हा आयुष्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या जागेची शोधाशोध सुरू आहे. महापालिकेच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली. त्यानंतर पहाडसिंगपुरा येथील जागेची नुकतीच पाहणी करण्यात आली. या परिसरात लेण्या असल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाकडून संबंधित जागेतील बांधकामाच्या दृष्टीने आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने त्यास मंजुरी दिली तर जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा आयुष्य रुग्णालयासाठी जागेची मागणी केली जाणार आहे.
आयुष औषधी अरण्यात काय राहील?
आयुष्य रुग्णालयाच्या परिसरात आयुष औषधी अरण्य साकारण्याचे नियोजन आहे. यामध्ये उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येईल. यातून रुग्णालयातच आयुर्वेदिक औषधी निर्मितीही शक्य होईल.
यापूर्वी घाटीतील जागेचीही पाहणी
आयुष रुग्णालयासाठी घाटीतील जागेचीही पाहणी करण्यात आली आहे. जागा देण्याची तयारीही घाटी प्रशासनाने दर्शविली होती. मात्र, घाटीऐवजी आता इतर ठिकाणी हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले जात आहे.