जिल्हा बँक निवडणूक : तीन पॅनेलची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:04 AM2021-02-25T04:04:41+5:302021-02-25T04:04:41+5:30
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किमान तीन पॅनेल निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अब्दुल सत्तार, संदिपान ...
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किमान तीन पॅनेल निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, हरिभाऊ बागडे आणि नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनेल, डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड, कैलास पाटील व अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनेल असे मिळून दोन पॅनेल उभे राहण्याची चर्चा होत होती. परंतु अंबादास मानकापे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका तिसऱ्या पॅनेलची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार हे भाजपचे हरिभाऊ बागडे व नितीन पाटील यांच्याबरोबर आहेत. राष्ट्रवादीचे अभिजित देशमुखही त्यांच्या बरोबरच आहेत. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मर्जीतले उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून उभे केले असल्याची चर्चा आहे.
आदर्श सहकारी बँकेचे अंबादास मानकापे पाटील यांनी विविध मतदारसंघांतून आपली माणसे उभी केली आहेत. तीच तीच माणसे, तेच तेच नात्यागोत्याचे राजकारण याला छेद देण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
डॉ. कल्याण काळे यांच्यासमवेत किरण पाटील-डोणगावकर, रवींद्र काळे, जगन्नाथ काळे ही मंडळी परिश्रम घेताना दिसत आहे.
अर्जांच्या छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक ही यादी कालच प्रसिद्ध व्हायला हवी होती. बुधवारी दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५ वाजता यादी बँकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली. हा विलंब कशासाठी होता, याची उलट-सुलट चर्चा होत होती.
दुसरे म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेचे कामकाज बँकेच्या कार्यालयातूनच होत आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. पहिल्यांदाच प्रथा खंडित झाली. सहकार खात्याच्या जिल्हा प्रबंधकांच्या कार्यालयातून निर्वाचन अधिकाऱ्याने निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे, असे जाणकारांचे मत पडले.
आचारसंहिता लागू असतानाही बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कार्यालयातून बैठका होणे, चर्चा होणे यालाही काहीजणांचा आक्षेप आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातूनच अर्ज भरणे, छाननी करणे,अर्ज मागे घेणे ही प्रक्रिया राबवावयास हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.