जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोध होणार की चुरस वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:16+5:302021-01-08T04:06:16+5:30

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. ती कशी ...

District Bank Election: Will it be uncontested or will it increase? | जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोध होणार की चुरस वाढणार?

जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोध होणार की चुरस वाढणार?

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. ती कशी होते याबद्दल जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे.

सर्व पक्षांची मोट बांधून उमेदवार निवडून आणण्यात सुरेशदादांचा जणू हातखंडाच राहिला. ही प्रथा त्यांचे चिरंजीव व बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांना चालू ठेवण्यात कितपत यश मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात हे मोठे आव्हान आहे. सुरेशदादांची गोष्ट वेगळी होती. त्यांचे वय आणि बँकेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव याबद्दल एक आदरभाव होता. काटकसरीचे नियोजन करून बँकेला नफ्यात आणण्याची किमया त्यांना साधली होती. ''पारदर्शी'' अशी त्यांची प्रतिमा बनली होती.

या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडणुकीत काय चित्र निर्माण होते, याबद्दल उत्सुकता आहे. सुरेशदादा पाटील अनेक जागा बिनविरोध निवडून आणण्यात यशस्वी होत असत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भाजप, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी असे पक्ष त्यांच्या पाठीशी शक्ती एकवटत असत.

एकूण २० संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे पाटील, महसूल खात्यासह विविध खात्यांचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार व विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्यासारखे दिग्गज बँकेचे विद्यमान संचालक आहेत. या निवडणुकीत या तिघांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

नितीन पाटील हे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझे वडील सुरेशदादा यांच्या निधनानंतर संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्ष बनविले. वर्षभर मी धुरा सांभाळली व मुदत संपल्यानंतर तेव्हाच निवडणूकही होऊन गेली असती. परंतु, कोरोना महामारी सुरू झाली आणि सतत तीनवेळा मुदतवाढ मिळत गेली. या काळात अध्यक्ष म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे व बँक नफ्यात कशी राहील, हे पाहिले आहे. यावेळी बँकेला चांगला नफा झालेला बघावयास मिळेल.

मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. प्राथमिक पातळीवर मी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलतोय. हळूहळू चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला.

विद्यमान संचालकांपैकी काही जणांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. उलट भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे दोन पॅनेल तरी दिसतील व निवडणूक चुरशीचीच होईल.

Web Title: District Bank Election: Will it be uncontested or will it increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.