जिल्हा वकील मंडळाचा ७ एप्रिलला मतदानाचा ‘बार’ !
By Admin | Published: April 1, 2016 12:53 AM2016-04-01T00:53:28+5:302016-04-01T01:05:35+5:30
लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीचा ‘बार’ लवकरच उडणार आहे. येत्या सहा तारखेला वकील मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून
लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीचा ‘बार’ लवकरच उडणार आहे. येत्या सहा तारखेला वकील मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात एप्रिलला बारची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. अण्णाराव पाटील यांनी चौथ्यांदा मैदानात उतरायचा मनोदय व्यक्त केला आहे. पाटील यांच्याविरोधात अद्याप उमेदवार ठरला नसला तरी यंदा त्यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी काही वकील मंडळी ‘कामाला लागली’ आहे. त्यामुळे ही सुध्दा निवडणूक यंदाही चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
लातूर जिल्हा वकील मंडळाचे सदस्य १२०० हून अधिक आहेत. वकील मंडळाच्या इतिहासात हॅटेट्रिक करणारे अण्णाराव पाटील एकमेव अध्यक्ष आहेत. आता चौथ्यांदा त्यांनी रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या विरोधात पॅनल उभारण्याच्या हालचाली चालू आहेत. पण अद्याप गुप्त बैठकांवरच ठिय्या आहे.
अण्णाराव पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा पुकारा केला असून ते बांधणीसाठी वकीलांच्या भेट मोहिमेवर निघाले आहेत.
सहा एप्रिल रोजी वकील मंडळाची सर्वसाधारण सभा होऊन निवडणूक निर्णय अधिकारी घोषित होईल. त्याच दिवशी अर्ज भरणे, छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया होईल. बिनविरोध झाली तर लगेच घोषणा आणि नाही झाली तर ७ एप्रिल रोजी दुपारी तीन पर्यंत मतदान आणि ५ पर्यंत निकालाची घोषणा होईल, असे वकील मंडळाच्या सूत्राने सांगितले. (प्रतिनिधी)
बार असोसिएशनची निवडणूक ही गेल्या तीन वर्षांपासूनच प्रतिष्ठेची झाली आहे. एखाद्या बँक - कारखान्याच्या निवडणुकीसारखी त्याची प्रतिष्ठा वाढली आहे. अॅड. अण्णाराव पाटील, अॅड. बळवंत जाधव आणि अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. मनोहर गोमारे, अॅड. उदय गवारे हे वेगवेगळ्या भूमिका असलेल्या राजकीय पक्षात काम करणारे सक्रीय कार्यकर्ते आहेत. वैचारिक भूमिका म्हणून यांचे मतभेद आहेत. मात्र बेद्रे, पाटील आणि जाधव हे एकमेकांचे वर्गमित्रही आहेत. या तिघांचीही भूमिका बारच्या निवडणुकीत निर्णायक राहीली आहे. हे एकत्रही असतात आणि एकही नसतात असे दोन्ही चित्र लातूरच्या वकीलांनी अनुभवले आहे. याशिवाय सामाजिक भूमिका मांडणारे मनोहर गोमारे आणि शेकापसारख्या लढाऊ पक्षाची धुरा वाहणारे गवारे यांच्या काय भूमिका आहेत, यावरही बारच्या निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.