रेल्वेसाठी आज जिल्हा बंद
By Admin | Published: May 5, 2017 12:03 AM2017-05-05T00:03:44+5:302017-05-05T00:06:51+5:30
उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेला बीदरपर्यंत वाढ न देता ही रेल्वे पूर्वीप्रमाणे लातूर येथूनच सोडावी, या मागणीसाठी ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे़
उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेला बीदरपर्यंत वाढ न देता ही रेल्वे पूर्वीप्रमाणे लातूर येथूनच सोडावी, या मागणीसाठी ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे़ जिल्हा बंद नंतर या मागणीसाठी ९ मे रोजी रेल्वे रोको आंदोलनही करण्यात येणार आहे.
लातूर एक्सप्रेस ही गाडी बीदरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या अनुषंगाने बुधवारी येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ बैठकीत बीदर येथून रेल्वे सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर हैद्राबाद-अहमदाबाद या गाडीला उस्मानाबाद येथे थांबा देण्यात यावा, हैद्राबाद-पुणे, कोल्हापूर-नागपूर या गाड्या दररोज सोडाव्यात, उस्मानाबाद-पुणे स्वतंत्र इंटरसिटी गाडी सुरू करावी आदी मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले़ यानुसार ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, सकाळी ११ वाजता उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून सर्व संस्था, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे़ या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ९ मे रोजी उस्मानाबाद रेल्वे स्थानकात या निर्णयाच्या निषेधार्थ व इतर मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे मंत्रालयाचे सदस्य शंकरराव बोरकर यांनीही मध्य रेल्वे विभागाला पत्र दिले आहे़ यात मुंबई- लातूर एक्सप्रेस रेल्वे लातूर येथूनच सोडावी, प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी बोरकर यांनी केली आहे़