जिल्हाधिकाऱ्यांचा गल्लेबोरगावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम; लसीकरण वाढविण्यासाठी गावोगावी दौरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 07:47 PM2021-11-16T19:47:32+5:302021-11-16T19:48:36+5:30
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी रात्री खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा, सुलीभंजन, वेरूळ, कसाबखेडा आदी गावांना भेटी देत रात्री साडेदहा वाजता गल्लेबोरगाव येथील शेतकरी दत्ता पा. खोसरे यांच्या घरी मुक्कामी थांबले.
खुलताबाद : कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून, ज्या गावांत लसीकरणाची टक्केवारी कमी आहे, तेथे जाऊन नागरिकांना लस टोचून घेण्याचे आवाहन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री गल्लेबोरगाव येथे एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून पाहुणचार घेतला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी रात्री खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा, सुलीभंजन, वेरूळ, कसाबखेडा आदी गावांना भेटी देत रात्री साडेदहा वाजता गल्लेबोरगाव येथील शेतकरी दत्ता पा. खोसरे यांच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री त्यांनी घरगुती जेवणास पसंती देत बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, मेथीची भाजी, मिरचीचा ठेचा व ग्रामीण भागात प्रसिद्ध अशी डुबूक वड्याची भाजी खाल्ली. रात्री त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तलाठी सचिन भिंगारे मुक्कामी थांबले होते.
शिवना टाकळी येथील जुन्या वाड्याची पाहणी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे पहाटे साडेपाच वाजता उठून फ्रेश झाले. यानंतर मॉर्निंग वॉक करीत पाच कि.मी. अंतरावर असलेल्या शिवना टाकळी धरणावर गेले. यावेळी त्यांच्या सोबत गल्लेबोरगावचे सरपंच विशाल खोसरे, चेअरमन तुकाराम हार्दे, संजय भागवत, संतोष राजपूत, देवीदास भागवत, दिलीप बेडवाल, तलाठी सचिन भिंगारे होते. त्यानंतर टाकळी येथील आहेर यांच्या जुन्या वाड्यास भेट देऊन त्यांनी आहेर कुटुंबीयांशी चर्चा केली.